गुंजवणीचे पाणी दोन वर्षांत शेतात : विजय शिवतारे

Dharan
Dharan

सासवड (पुणे) : गुंजवणी प्रकल्पाच्या पाइपलाइनचे काम या महिनाअखेरीच्या आत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या गुंजवणी प्रकल्पाच्या पाइपलाइनची निविदा एप्रिल महिन्यात काढण्यात आली होती. सुमारे एक हजार कोटींहून जास्त रकमेचे हे काम लार्सन अँड टुब्रो कंपनी करणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. दीड ते दोन वर्षात तीनही तालुक्‍यातील शेतांमध्ये पाणी खेळणार असल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले.

कालव्याऐवजी बंद पाइपलाइनचे धोरण स्वीकारल्यानंतर "गुंजवणी' हा देशातील पहिला बंद पाइपलाइन प्रकल्प ठरणार आहे. धरणापासून ते शेवटच्या गावापर्यंत पाण्याचं सर्वत्र सम प्रमाणात वितरण होते आहे का यावर नियंत्रण ठेवणारी आधुनिक "स्काडा' प्रणाली या योजनेत वापरण्यात येत आहे. आउटलेट मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे मागणीएवढेच पाणी वितरीत करणारी संगणकीय व्यवस्था विकसित आहे. संपूर्ण पाइपलाइनमध्ये कुठेही किरकोळ स्वरूपाची जरी गळती झाली, तरी याबाबत तत्काळ जलसंपदा विभागाला सावध करणारी "लिकेज ऍलर्ट' यंत्रणा यात असेल. पाणी वितरणावर थेट नियंत्रण ठेवत रिमोट पद्धतीने योजना चालू-बंद करण्याचाही पहिला प्रयोग योजनेत असेल. जलवाहिनीवर दाब येऊन वाहिनी फुटू नये यासाठीची अत्याधुनिक "सर्ज प्रोटेक्‍शन' प्रणालीदेखील यात आहे.

योजनेची पंचसूत्री व सासवडला सोहळा
शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार पिके घेण्याचे स्वातंत्र्य, 365 दिवस 24 तास पाणी उपलब्धता, ठिबक किंवा पाट पद्धतीने पाणी वापरण्याची तिन्ही तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना मुभा, 2400 मिलिमीटर व्यासाचा पाइप, आवश्‍यक तेथे "स्लुईस व एअर वॉल्व्ह' ही या योजनेची प्रमुख पंचसूत्री आहे. विजय शिवतारे यांनी सांगितले की, पाइपलाइन भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लवकरच वेळ निश्‍चित होणार आहे. तसेच खास सभा सासवडच्या पालखी तळावर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com