गुंजवणी बंद वाहिनीला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

सासवड - पुरंदर, भोर आणि वेल्ह्यासाठी लाभदायक ठरणाऱ्या गुंजवणी धरणानंतर आता सिंचन प्रकल्पातील बंद जलवाहिनीच्या कामास आज मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. तब्बल २१ हजार ३९२ हेक्‍टर क्षेत्रास बंद नलिकेद्वारे पाणी देण्यासाठी १ हजार ३१३ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. 

मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत गुंजवणीचा विषय समाविष्ट होता. त्यामुळे त्यात काय होते, याची उत्कंठा होती. बैठकीचा सकारात्मक वृत्तान्त समजताच सर्वत्र एकच जल्लोष पसरला. यानिमित्ताने शिवसेनेचे शहरप्रमुख अभिजित जगताप म्हणाले, ‘‘गुंजवणी हा पुरंदरसह भोर आणि वेल्ह्याच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय आहे. शिवतारे यांच्या रूपाने पुरंदरमध्ये जणू भगीरथाचा वारस जन्माला आला. ज्यांनी गुंजवणीची खिल्ली उडवली, त्यांना आज शिवतारे यांनी कामातूनच उत्तर दिले.’’

नगरसेवक सचिन भोंगळे म्हणाले, ‘‘गुंजवणी ही एक संघर्षगाथा आहे. गुंजवणीसाठी उपोषण करणाऱ्या गुलाब जगताप यांचे आज स्मरण होते. पालखीतळावरील उपोषण, सिंचन भवनवर काढण्यात आलेली जलदिंडी आणि त्यातील विविध प्रसंग आज डोळ्यांसमोरून जात आहेत. शिवतारे यांचे पुरंदरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.’’

यानिमित्त सासवडला आनंद व्यक्त करण्यासाठी पंचायत समिती सदस्या नलिनी लोळे, अस्मिता रणपिसे, डॉ. राजेश दळवी, श्‍यामराव जगताप, प्रदीप लांडगे, कुंडलिक जगताप, मंदार गिरमे, राहुल दाते, बाळासाहेब जगताप, बाळासाहेब भिंताडे, जितेंद्र पवार, कुणाल जगताप, ओंकार जगताप, सागर जगताप, मिलिंद इनामके, विराज जगताप, मंगेश जगताप, प्रीतम जगताप, केदार क्षीरसागर, मंगेश भिंताडे, राजेंद्र क्षीरसागर, विकास नाळे, सौरभ जगताप, छाया सुभागडे, अनिल जगताप, सचिन जाधव, प्रियांका गिरमे आदींनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

गुंजवणी प्रकल्पासाठी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन केलेली मेहनत सर्वश्रुत आहे. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत समाधानाचा आणि तिन्ही तालुक्‍यांसाठी आनंदाचा आहे. पाइपलाइनच्या कामासाठी आता तातडीने टेंडर काढले जाईल. समारंभपूर्वक काम चालू केले जाईल. सर्व समर्थक आणि विरोधकांना अगत्याने बोलावले जाईल. 
 - विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री

Web Title: gunjawani waterline permission