केंद्राच्या पॅकेजमधून वेतन, पीएफ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

केंद्र सरकारने हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍सचे खासगीकरणाच्या माध्यमातून पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही प्रक्रिया होत असताना कामगारांच्या हिताची जपणूक करण्यात येणार आहे. 
- अरुण बोऱ्हाडे, उपाध्यक्ष, एचए मजदूर संघ

पिंपरी - अनेक दिवसांपासून थकीत असलेली हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स (एचए) लिमिटेडच्या कामगारांची रक्‍कम देण्यासाठी केंद्र सरकारने २८० कोटींची तरतूद केली आहे. यामधून थकीत पगार, प्रॉव्हिडंट फंडांची रक्‍कम तसेच पाचशे कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात येणार आहे. याखेरीज कंपनीमधून निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युइटीची रक्‍कमदेखील दिली जाणार असल्याचे एचए मजदूर संघाचे उपाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे यांनी सांगितले. 

कंपनीमधील ९५० कामगारांच्या वेतनाची सुमारे ८० कोटी रुपयांची रक्‍कम गेल्या २३ महिन्यांपासून थकली आहे. त्यामुळे आधी थकीत वेतन दिले जाईल. प्रॉव्हिडंट फंडाची थकीत रक्‍कम १११ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. त्यामुळे या पॅकेजमधील किती रक्‍कम प्रॉव्हिडंट फंडाला द्यायची यासंदर्भातील निर्णय दिल्लीतल्या मुख्यालयाकडून घेण्यात येणार आहे.

सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी पाचशे जणांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी सुमारे १६० कोटी रुपयांची रक्‍कम द्यावी लागणार आहे. केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या २८० कोटी रुपयांचे पॅकेज हे कामगारांची देणी देण्यावर खर्च करण्यात येणार असल्याचे बोऱ्हाडे यांनी नमूद केले.

मंत्रिगटाची स्थापना
एचएचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने ८२१ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र तूर्तास केंद्र सरकारने २८० कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून या कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच एका मंत्रिगटाची स्थापना केली आहे. कारखान्याच्या स्थितीचा आढावा घेऊन लवकरच या गटाकडून याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने २०१६ मध्ये एचएला थकीत देणी देण्यासाठी १०० कोटी रुपये दिले होते. त्याचवेळेस कंपनीकडे असणाऱ्या जमिनीची केंद्र आणि राज्य सरकारी कंपन्या आणि आस्थापनांना विक्री करून त्यामधून उभ्या राहणाऱ्या भागभांडवलातून कारखाना उभा करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. मात्र जमीनविक्रीस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुनरुज्जीवनासाठी अपेक्षित भागभांडवल उभे राहू शकले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HA Company Retired Employee Salary PF gratuity