esakal | मगरपट्टा चौकातील खुनाचे गूढ उकलले; टेम्पोच्या नंबरवरून चौघांचा लागला छडा
sakal

बोलून बातमी शोधा

hadapsar magarpatta square murder four arrested

पांढऱ्या रंगाच्या पिकअप मधून आलेले चार जण हडपसर हद्दीतील मगरपट्टा चौकातातील फुटपाथवर मृतदेह टाकतून पळाले होते. चौकात गर्दी असल्याने, मृतदेह टाकतांना अनेकांनी पाहिल्याने, हडपसर परीसरात एकच खळबळ उडाली होती.

मगरपट्टा चौकातील खुनाचे गूढ उकलले; टेम्पोच्या नंबरवरून चौघांचा लागला छडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर (पुणे) : नववर्षाच्या पहिल्याच दिवसी हडपसर हद्दीतील मगरपट्टा चौकातील फुटपाथवर ऐन गर्दीच्या वेळी एका मालवाहू पिकअप टेंम्पोतून आणून टाकलेल्या मृतदेहाचे गुढ उकलण्यात लोणी काळभोर व हडपसर पोलिसांना यश आले आहे. लोणी काळभोर येथील एका केटरर्सने आपल्याच एका कामगारांचा खून करुन, मृतदेह हडपसर हद्दीतील मगरपट्टा चौकातील फुटपाथवर टाकल्याचे निस्पन्न झाले आहे.

आणखी वाचा - पुण्याचे नाव जिजापूर करण्याची मागणी

या प्रकरणी लोणी काळभोर येथील एका केटरर्ससह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. संतोष (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) हे त्या खून झालेल्या कामगारांचे नाव आहे. संतोषचा खुन करुन, त्याचा मृतदेह हडपसर हद्दीतील मगरपट्टा चौकातील फुटपाथवर टाकल्याप्रकरणी पोलिसांनी नारायण शंकर व्यास (रा. रामदरा रोड साठेवस्ती, लोणी काळभोर, मुळ रा.रेणवास ता कोठडी जि भिलवाडा, राजस्थान) केटरर्ससह नारायण शंकर व्यास (वय ३० वर्षे,  रा. साठेवस्ती, लोणीकाळभोर ता.हवेली), जितेश तुकाराम कदम (वय ३१ वर्ष, रा. साडेसतरानळी कॉर्नर मारुती मंदिराशेजारी हडपसर), संतोष सुंदर पुजारी (वय ३५ वर्षे, जनवाडी जनता वसाहत, गोखलेनगर पुणे) व संपत मारुती कळंत्रे (वय ४१ वर्षे, रा. हडपसर भाजीमंडई जवळ, हडपसर) या चार जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत रामचंद्र गायकवाड (वय 45) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी (ता. १) सकाळी दहाच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या पिकअप मधून आलेले चार जण हडपसर हद्दीतील मगरपट्टा चौकातातील फुटपाथवर मृतदेह टाकतून पळाले होते. चौकात गर्दी असल्याने, मृतदेह टाकतांना अनेकांनी पाहिल्याने, हडपसर परीसरात एकच खळबळ उडाली होती. ही बातमी हडपसर पोलिसांनी समजताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह टाकणाऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका इसमाने पिकअप टेंम्पोचा नंबर पोलिसांना दिल्याने, त्या नंबरवरुन पोलिसांनी अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. यात सदर पिकअप टेंम्पो हा लोणी काळभोर येथील नारायण व्यास याच्या मालकीचा असल्याचे पोलिस तपासात निस्पन्न झाले. हडपसर पोलिसांनी लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने नारायण व्यास याला ताब्यात घेतले असता, संतोषच्या मृतदेहाचे गुढ उकलण्यात पोलिसांनी यश आले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आरोपी अटकेत, हेतून मात्र गुलदस्त्यात
संतोषच्या खूनप्रकरणी पोलिसांनी नारायण व्यास या केटरर्ससह चार जणांना अटक केली असली तरी, संतोशचा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला हे गुलदस्त्यातच आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील एका स्थानिक व्यक्तीच्या घराच्या पूजेसाठी जेवण बनवून देण्याचे कंत्राट नारायण व्यास याने घेतले होते. याच कामासाठी नारायण व्यास याने, मयत संतोषसह जितेश कदम, संतोष पुजारी, व संपत कळंत्रे या चौघांना बोलावले होते. काम संपल्यावर व्यास यांच्या घरी चौघेही झोपले. मात्र, सकाळी उठले असता, संतोष मृताअवस्थेत आढळून आला. यावर नारायण व्यास व जितेश कदम, संतोष पुजारी, व संपत कळंत्रे या तिघांनी मिळून संतोषचा मृतदेह पिकअप टेंम्पोतून हडपसर हद्दीतील मगरपट्टा चौकात फुटपाथवर टाकला होता. पोलिसांनी संतोषच्या मृतदेहाचे शविच्छेदन केले असता, संतोषचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे उघड झाले आहे. पुढील तपास हवेलीच्या उपविभागीय अधिकारी सई भोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरज बंडगर करीत आहेत.

loading image