राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा गाठीभेटींवर भर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

हडपसर - महापालिकेच्या प्रभाग क्र. २५ (वानवडी) मधून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचाराची तिसरी फेरी पूर्ण केली आहे. मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. बैठी घरे, उंच सोसायट्या या प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे.  

हडपसर - महापालिकेच्या प्रभाग क्र. २५ (वानवडी) मधून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचाराची तिसरी फेरी पूर्ण केली आहे. मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. बैठी घरे, उंच सोसायट्या या प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे.  

या प्रभागातून महापौर प्रशांत जगताप, त्यांच्या मातु:श्री माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, दिलीप जांभूळकर आणि कांचन जगताप हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौरपद जगताप यांच्याकडे असल्याने व गेली दहा वर्षे या भागात राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे झाली आहेत. सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडणारा कार्यकर्ता म्हणून जगताप यांची ओळख असल्याने प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. 

चारही उमेदवारांनी वानवडी गावात होले मळा, जांभूळकर मळा, वानवडी गावठाण, तात्या टोपे सोसायटी, परमारनगर, धाडगेनगर, चौगुले मळा, परमारनगर या भागात प्रचार दौरा काढला. या वेळी सरोज जांभूळकर, सिमा होले, इंदू शिंदे, विठ्ठल चौघुले, नंदू होले, विकास शिंदे, अनिल रोकडे, दत्तात्रेय शिंदे, धनजंय लोंढे, नाना सांडभोर, मारी गव्हाणे, विजया रोकडे, सुनीता जाधव, स्मिता बरवे, दत्तात्रेय शिंदे, अतुल भाटे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

महापौर जगताप म्हणाले, ‘‘माझ्या वॉर्डात मी ९२ कोटींची विकासकामे केली आहेत. पायाभूत सुविधांना प्राधान्यक्रम देत रस्ते सुधारणा, पथदिवे, चौकांचे शुशोभिकरण, नियमित पाणी व्यवस्थापन, जॉगिंग पार्क, फूटपाथ या गोष्टींसह वानवडी पोलिस चौकी व क्रीडा मैदानासाठी आरक्षणे मंजूर करून घेतली. ‘एचटीएमटीआर’ रस्त्याचा आराखडा बदलून त्या अंतर्गत विस्थापित होणारी शाळेची जागा व इतर घरे वाचवली. वानवडी छत्रीचे शुभोभिकरण केले. त्यामुळे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विकासकामांच्या जोरावर आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार निवडणूक जिंकणारच याचा मला पूर्ण विश्वास आहे. वानवडीतील नागरिकांनी दिलेली प्रेरणाच मला वानवडीसह पुणे शहराच्या विकासाची नवी उमेद देत असते.

Web Title: hadapsar prabhag 25 ncp