दुसऱ्या दिवशीही कचरागाड्या अडवल्या

दुसऱ्या दिवशीही कचरागाड्या अडवल्या

हडपसर - प्रस्तावित कचरा प्रकिया प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी (बुधवारी) महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या आंदोलकांनी अडवून परत पाठविल्या. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शिवसेना आणि हडपसर-रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव समितीने उडी घेतली आहे. दोन्ही पक्षांचे आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.

या प्रसंगी नगरसेवक वैशाली बनकर, नाना भानगिरे, अशोक कांबळे, माजी उपमहापौर नीलेश मगर, सुनील बनकर, सागरराजे भोसले, उत्तम आढाव, अप्पा गरड, मुकेश वाडकर, सतीश हिंगणे, संजय हिंगणे, श्रीधर शरणागत, दत्ता झेंडे, पप्पू कुदळे, अप्पा शिंदे, तुषार जाधव, युसूफ पठाण, इरफान तांबोळी, तौफिक सय्यद, नदीम पटेल, शरीफ पठाण, जॅकी कल्याणी, रॉकी कल्याणी, नागेश काळुंखे, मुस्ताक शेख, सतीश कांबळे, अर्जुन कांबळे आदी उपस्थित होते.

रामटेकडी येथील पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशनच्या कार्यशाळेसमोर हे आंदोलन झाले. रामटेकडी येथील महापालिकेच्या प्रस्तावित कचरा प्रकल्पाचे काम बंद झालेच पाहिजे, अशी नागरिक व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गाड्या अडविल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. हडपसर विधानसभा मतदारसंघात पाच कचरा प्रकल्प आहेत. त्यामुळे हडपसरची कचरानगरी होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिकांची आहे. या प्रश्नाबाबत महिनाभरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सहा आंदोलने झाली आहेत. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यादेखील या प्रकल्पाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्यामुळे कचरा प्रकल्पाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटतच चालला आहे.

काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे गटनेते हडपसर येथे प्रस्तावित कचरा प्रकल्प व्हावा, यासाठी पालिकेतील सत्ताधारी भाजपला साथ देत आहेत; मात्र या तिन्ही पक्षांचे स्थानिक नगरसेवक व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्ष व महापौर आणि आयुक्तांचा निषेध करतो. प्रस्तावित प्रकल्पाचे काम थांबवावे; अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल.
- योगेश ससाणे, अध्यक्ष, हडपसर प्रभाग समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com