हडपसरमध्ये राष्ट्रवादीने कचरागाड्या अडवल्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

हडपसर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रोकेम कचरा प्रक्रिया प्रकल्पाकडे जाणाऱ्या महापालिकेच्या कचरागाड्या अडवून परत पाठवल्या. तसेच रामटेकडी येथील महापालिकेच्या प्रस्तावित कचरा प्रकल्पाचे काम बंद झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. जनतेचा विरोध डावलून या प्रकल्पाचे काम सुरू ठेवले तर रोकेम प्रकल्प बंद पाडू, असा इशाराही आंदोलकांनी महापालिका प्रशासनाला दिला. हे आंदोलन विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी अकराच्या सुमारास रामटेकडी येथे झाले. 

हे आंदोलन पूर्वनियोजित नव्हते. अचानक गाड्या अडविल्या गेल्याने रामटेकडी ते औद्योगिक वसाहत या दरम्यानच्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला. घटना समजताच वानवडी पोलिस तत्काळ पोचले. परवानगीशिवाय आंदोलन करू नका, अशी समज पोलिसांनी आंदोलकांना दिली. त्यानंतर पोलिस निघून गेले. त्यानंतरही पुन्हा काही कार्यकर्त्यांनी कचरागाड्या अडवून परत पाठविल्या. 

याप्रसंगी हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, नगरसेवक अशोक कांबळे, उत्तम अल्हाट, मामा अल्हाट, हेमंत ढमढेरे, जॅकी कल्याणी, नागेश काळुंखे, अप्पा गरड, अप्पा शिंदे, तुषार जाधव, युसूफ पठाण, इरफान तांबोळी, तौफिक सय्यद, चिंतामण लाकडे, नदीम पटेल शरीफ पठाण, मुस्ताक शेख उपस्थित होते.   

रामटेकडी येथील रोकेम प्रकल्पात सध्या ३०० टन प्रतिदिन कचरा येत आहे. जर १२५० टनांचे नवीन प्रकल्प सुरू झाले, तर रामटेकडी वसाहतीतील नागरिकांना रस्त्यावर चालणे अवघड होणार आहे. कारखाने बंद होऊन, बेरोजगारीत वाढ होईल. दुर्गंधी व रोगराई वाढून सार्वजनिक आरोग्य धोक्‍यात येईल, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले. 

केवळ अाश्‍वासन; ठोस निर्णय नाहीच
यापूर्वी महापालिकेच्या प्रस्तावित कचरा प्रकल्पास विरोध करण्यासाठी शिवसेना, हडपसर-रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव समिती यांनी दोन मोठी आंदोलन केली. राष्ट्रवादी पक्ष तसेच हडपसर-रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव समितीने कचरा प्रकल्पाविरोधात जनजागृती सुरू केली आहे. अगोदरच या भागात महापालिकेचे चार प्रकल्प आहेत. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत वळले आहे. पालिका आयुक्तांनी याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करू, असे आश्‍वासन दिले आहे. मात्र ठोस निर्णय दिलेला नाही. त्यामुळे येथील कचरा प्रकल्पाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटत चालला आहे.

Web Title: hadapsar pune news In Hadapsar NCP blocked the garbage dumps