जटामुक्तीचा अनोखा वसा

हडपसर - मुलीला जटांतून मुक्ती देताना नंदिनी जाधव.
हडपसर - मुलीला जटांतून मुक्ती देताना नंदिनी जाधव.

हडपसर - केसांच्या जटा ही एक मोठी समस्या आहे. केसात जटा झालेल्या स्त्रियांच्या मनातील भीती दूर करायची, त्यांना जटा सोडवून घेण्यासाठी तयार करायचे, केसातल्या जटा सोडवायच्या, त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यायचे आणि वेळोवेळी समुपदेशन करायचे, असे मुलखावेगळे काम हडपसर येथील नंदिनी जाधव करीत आहेत. त्यांनी ‘जटामुक्त समाजाचा’ वसा घेतला आहे. कोणताही मोबदला न घेता गेली पाच वर्षे त्या हे कार्य करीत आहेत. त्याचबरोबर त्या अंनिसच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य गावोगावी जाऊन करीत आहेत.

नंदिनीताईंनी आतापर्यंत ३८ महिलांना जटांच्या ओझ्यातून मुक्ती दिली आहे. महिलांच्या डोक्‍यावरील ५ ते ११ किलो वजनाच्या जटा त्यांनी कमी केल्या आहेत. ही मुक्ती डोक्‍यावरच्या जटांचीच नसते, तर त्या सोबतीने येणाऱ्या अनेकविध अंधश्रद्धेतून महिला, त्यांचे कुटुंबीय आपसुकच बाहेर पडतात. ही किमया एका दिवसात घडत नाही. त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो. अपमान गिळावा लागतो आणि प्रसंगी आवाजही चढवावा लागतो. ही कला नंदिनीताईंनी चांगलीच अत्मसात केली आहे. 

नंदिनीताई मूळच्या मेकअप आर्टिस्ट. ब्युटिशनचंही प्रशिक्षण त्यांनी घेतलंय. जटा असलेल्या महिलांच्या जटा सोडविण्याची प्रथम संधी अंनिसच्या माध्यमातून त्यांना मिळाली. त्यांचं ब्युटिशनचं प्रशिक्षण येथे कामी आले. ब्युटिशयनचा व्यवसाय पाणी सोडून पूर्णवेळ जटामुक्त समाजाचा व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले. 

अस्वच्छतेमुळे केसांमध्ये तयार होणाऱ्या जटांकडे अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहिले जाते. अनेकदा जट आलेल्या महिलांच्या अंगात येते. पण अंगात येणे हा देखील एक मानसिक आजारच असतो. याविषयी नंदिनीताई सांगतात, अंगात येणे हा हिस्टोरियाचा प्रकार असतो. मानसिक तणाव असह्य झाला, की त्या अशा विचित्र वागतात. केसात जट झाली, की त्यांना अनेक शुभकार्यापासून दूर ठेवले जाते. अशा अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या मानसिकतेतून महिला व कुटुंबीयांना बाहेर काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो.

... तर देवीचा कोप होईल
नंदिनीताई म्हणाल्या, ‘‘जटांचा संबंध देवीदेवतांशी जोडला जातो. त्या सोडविल्यावर देवीचा कोप होईल, जटा सोडविणाऱ्यांचे हात झडतील, डोळे जातील, अशा अंधश्रद्धा आजही आहेत. त्यामुळे जटा सोडवून घेण्यासाठी या स्त्रिया तयार होत नाहीत. त्यांना, त्यांच्या नातेवाइकांना जटा होण्यामागची कारणं आणि जटा सोडविणं का आवश्‍यक आहे, हे पटवून देणं महत्त्वाचं आहे. एकदा का ती स्त्री जटा सोडवून घ्यायला स्वखुशीने तयार झाली, की अर्धी लढाई जिंकल्यासारखी आम्हाला वाटते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com