Hadapsar Railway Terminal : हडपसर रेल्वे टर्मिनल विकासासाठी १३६ कोटी मंजूर

पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी हडपसर टर्मिनलचा विकास होणे गरजेचे आहे.
Hadapsar Railway Station
Hadapsar Railway Stationsakal
Summary

पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी हडपसर टर्मिनलचा विकास होणे गरजेचे आहे.

पुणे - हडपसर स्थानकावर नवीन तीन इमारती, प्रवाशांना बसण्यासाठी वेटिंग रूम, राहण्यासाठी रिटायरिंग रूम, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, छोटेसे कॅन्टीन, प्रशस्त पार्किंग, फलाटावर पूर्ण कव्हर्ड शेड यांसह अन्य सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. रेल्वे बोर्डाने हडपसर टर्मिनलसाठी तब्बल १३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. येत्या काही दिवसांत स्थानकाच्या विकासाचे काम सुरू होणार आहे. तसेच, या निधीतून ५० कोटी रुपये किमतीच्या जागेचे संपादन होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी हडपसर टर्मिनलचा विकास होणे गरजेचे आहे. पूर्वी यासाठी १७ कोटी रुपयांची मागणी केली होती, मात्र अर्धा हेक्टर जमिनींसाठीच तब्बल ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे लक्षात घेत पुणे रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाला १३६ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव दिला होता. त्याला रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिलकुमार लाहोटी यांनी मंजुरी दिली. त्यामुळे हडपसर टर्मिनलचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

‘गती-शक्ती’ करणार काम

रेल्वेचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गती-शक्ती युनिटची स्थापना केली आहे. आता हेच युनिट हडपसर टर्मिनलचा विकास करणार आहे. स्थानकाच्या विकासासह येथे दोन नवीन स्टेबलिंग लाइन बांधणे, सिग्नलिंग यंत्रणा नव्याने उभारणे यांसह अन्य कामे केली जाणार आहेत. भू-संपादनासाठी १० तुकड्यांमध्ये जमीन रेल्वे प्रशासन ताब्यात घेणार आहे. राज्य सरकारकडून त्याची मोजणी सुरू आहे. भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात जमीन रेल्वेच्या ताब्यात येण्यास चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र, त्या दरम्यान रेल्वे प्रशासन प्रवासी सुविधांच्या कामाला सुरुवात करणार आहे.

हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी १३६ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविला होता. तो मंजूर झाला आहे. यातून स्थानकाचा विकास केला जाईल. तसेच, भू-संपादनदेखील करण्यात येणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील.

- बी. के. सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, रेल्वे विभाग, पुणे

हडपसरमधील सद्यःस्थिती...

  • दोन फलाट वापरात

  • तीन फलाटांचे बांधकाम पूर्ण; मात्र लाइन जोडण्याचे काम अपूर्ण, त्यामुळे वापर नाही.

  • सरासरी १० डेमूला थांबा.

  • आठवड्यातून तीन दिवस हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस व हडपसर-सोलापूर डेमूच्या प्रवासाला सुरुवात

  • दैनंदिन प्रवासी संख्या : लोकलला सुमारे २००, तर एक्स्प्रेसला सुमारे ५००

कोणती कामे होणार?

  • स्थानकावर तीन नव्या इमारती. यात प्रवाशांसाठी वेटिंग रूम, रिटायरिंग रूम, क्लॉक रूम

  • स्थानकाच्या समोर असलेली रेल्वे कर्मचाऱ्यांची घरे पाडून तिथे पार्किंग व रस्ता

  • आरआरआय केबिन, तसेच स्थानक व्यवस्थापकाचे कार्यालय

  • स्टेबलिंग लाइनसाठीची जागा खरेदी करण्याचे प्रयत्न

  • दौंडच्या दिशेने असलेल्या फलाटाजवळून रस्ता तयार करणार, त्यामुळे स्थानकाला दोन्ही बाजूने प्रवेश मिळणार

  • दुसऱ्या बाजूने स्थानकावर प्रवेश मिळणार असल्याने प्रवाशांना खराडीच्या पुलाचा वापर करून फिरून येण्याची आवश्यकता भासणार नाही, त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होईल

  • प्रवाशांच्या वाहनांसाठी पार्किंग

  • स्थानकावर प्रतीक्षालयासह स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय

  • स्थानकावर सरकता जिना अथवा लिफ्ट

  • संपूर्ण फलाटाच्या शेडवर कव्हर. ऊन व पावसात प्रवाशांची सोय

  • खाद्यपदार्थांचे स्टॉल, उपाहारगृह

  • गाड्यांची माहिती कळण्यासाठी ‘पीआयएस’ प्रणाली, यात उद्घोषणा, डिस्प्ले बोर्डाचा समावेश.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com