हडपसरमध्ये पालखीच्या स्वागताची तयारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

मांजरी (पुणे) : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व ज्ञानेश्र्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी (ता. ९) शहरातील शेवटचा विसावा असलेल्या हडपसर परिसरात दाखल होऊन पुढे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार आहे. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिकांची गडबड उडाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्याची आणि त्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी गेली आठवडाभरापासून अनेक सार्वजनिक मंडळे व काही कुटुंबाकडून जोरदार तयारी सुरू आहे. पालिका, पोलीस व वाहतूक प्रशासनानेही यु्ध्द पातळीवर स्वागताची तयारी केली आहे.

मांजरी (पुणे) : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व ज्ञानेश्र्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी (ता. ९) शहरातील शेवटचा विसावा असलेल्या हडपसर परिसरात दाखल होऊन पुढे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार आहे. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिकांची गडबड उडाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्याची आणि त्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी गेली आठवडाभरापासून अनेक सार्वजनिक मंडळे व काही कुटुंबाकडून जोरदार तयारी सुरू आहे. पालिका, पोलीस व वाहतूक प्रशासनानेही यु्ध्द पातळीवर स्वागताची तयारी केली आहे. ""साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा'' अशा भावनेचा आनंद येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर सध्या पाहवयास मिळत आहे.

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामा नंतर हडपसर येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड मुक्कामी व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणीकाळभोर मुक्कामी मार्गस्थ होणार आहे.  त्या निमित्ताने महानगरपालिका, पोलीस, पीएमपीएल प्रशासनाकडून वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, वाहतूक विभाग सहाय्यक पोलिस आयुक्त देविदास पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, वाहतूक निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी 
गाडीतळ पिएमपीएल बसस्टॉप, हरपळे बिल्डिंग, मांजरी फार्म येथील विसावा स्थळाची व मार्गाची पाहणी केली. सुमारे ५०० पोलीस कर्मचारी व २५० स्वयंसेवक पालखीमार्ग, विसावास्थळ व  दर्शनबारीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व भाविकांना सुलभ दर्शन मार्ग करण्यासाठी उपस्थित असणार आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे म्हणाले,""दोन्ही पालखी सोहळे हडपसर परिसरात एकत्र येत असल्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी असते. त्यामुळे साखळी चोरी व महिला-मुलींच्या छेडछाडीचे प्रमाणही मोठे आहे. ते रोखण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरातील महाविद्यालये व सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक पोलिसांना सहकार्य करणार आहेत. भाविकांच्या व नागरिकांच्या मदतीसाठी परिसरीत पोलीस मदत केंद्रे सुरू केली आहेत.'' 

सोलापूर रोड व सासवड रोड या पालखी मार्गाला जोडणारे इतर वाहतूक मार्ग सकाळी बंद करण्यात येतील. पालखी हडपसर मधून पुढे मार्गस्थ झाल्यावर टप्प्या टप्प्याने मार्गावरील वाहतूक सूरू होईल. अशी माहिती वाहतूक निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.

पालखी मार्ग व फूटपाथवर कोणत्याही प्रकारचे मंडप उभारण्यात येऊ नयेत तसेच नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने फ्लेक्स लावले जाऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेकडून विसावा मंडप उभारण्यास मर्यादा आणल्यामुळे येथील स्थानिक बारा नगरसेवकांनी एकत्रीतपणे मंडप उभारणीचा खर्च केला आहे. त्यामुळे मंडप उभारणीचा प्रश्र्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे. सासवड रस्त्यावरील संत ज्ञानेश्र्वर महाराज तर सासवड रस्त्यावरील संत तुकाराम महाराज विसावा चौथऱ्यावर मंडप उभारणी करण्यात आली आहे.  

Web Title: hadapsar ready to welcome palakhi