हागणदारीमुक्त शहरासाठी २३,२०२ ‘दरवाजे बंद’

पीतांबर लोहार
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पिंपरी - शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी महापालिकेने उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून, सार्वजनिक व घरगुती स्वच्छतागृहे उभारण्यावर भर दिला आहे. वैयक्तिक, तात्पुरते (फिरते) आणि मोफत व ‘पैसे द्या-वापरा’ तत्त्वावर सार्वजनिक असे २३ हजार २०२ स्वच्छतागृहे उभारून ‘दरवाजा बंद’ केला आहे. 

पिंपरी - शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी महापालिकेने उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून, सार्वजनिक व घरगुती स्वच्छतागृहे उभारण्यावर भर दिला आहे. वैयक्तिक, तात्पुरते (फिरते) आणि मोफत व ‘पैसे द्या-वापरा’ तत्त्वावर सार्वजनिक असे २३ हजार २०२ स्वच्छतागृहे उभारून ‘दरवाजा बंद’ केला आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘दरवाजा बंद’ मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत पालिकेने शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी झोपडपट्टीतील व फिरत्या बेघर व्यक्तींचे स्वच्छतागृहांचा वापर करण्याबाबत प्रबोधन केले जात आहे. तसेच, दुर्बल घटकांतील कुटुंबांना वैयक्तिक स्वच्छतागृहे उभारणीसाठी केंद्र व राज्य सरकारसह महापालिकेतर्फे अनुदान दिले जात आहे. झोपडपट्टी क्षेत्रामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढविली जात आहे. विविध कंपन्या व सेवाभावी संस्थांच्या मदतीनेही स्वच्छतागृहांची उभारणी केली जात आहे. शहरात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी मजुरांसाठी बांधकाम व्यावसायिकांनीच स्वच्छतागृहे उभारायची आहेत. 

पैसे द्या व वापरा
सुलभ इंटरनॅशनल संस्थेतर्फे ‘पैसे द्या व वापरा’ तत्त्वावर झोपडपट्टी क्षेत्रात ४७८ सीट्‌सची व झोपडपट्टी क्षेत्राबाहेर २७२ सीट्‌सचा सार्वजनिक स्वच्छतागृहे चालविली जात आहेत. झोपडपट्टी क्षेत्रात आणखी २४० सीट्‌सच्या स्वच्छतागृहांची भर पडणार असून, त्यांचे बांधकाम सुरू आहे. तरंगत्या म्हणजेच फिरस्त्या लोकांसाठी रोटरी क्‍लब ऑफ इंटरनॅशनल संस्थेतर्फे सहा ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडून जागेचा ताबा देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिकांमार्फत ७२ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारणीचे उद्दिष्ट आहे. त्यातील सहा ठिकाणी बांधकाम व्यावसायिक व ११ ठिकाणी सेवाभावी संस्थांकडून महापालिकेकडे प्रस्ताव आलेले आहेत. 

असे मिळते अनुदान
केंद्र सरकार    ४००० 
राज्य सरकार    ८०००
महापालिका    ४०००
एकूण    १६०००

दृष्टिक्षेपात स्वच्छतागृहे
क्षेत्र    संख्या    सीट्‌स

निवासी    २७९    २९३६
झोपडपट्टी    १९६    २१९६
तात्पुरती    २९    १९८
मनपा इमारती    ३१८    ९०४
उद्याने    ५२    १००
एकूण    ८७४    ६३३४

शहर हागणदारीमुक्त करण्याच्यादृष्टीने वैयक्तिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी दुर्बल घटकांतील नागरिकांना अनुदान दिले जात आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढविली जात आहे. उघड्यावर शौच करणाऱ्यास पाचशे रुपये दंड आकारला जात आहे.
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

वैयक्तिक प्रस्ताव
वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणीसाठी आतापर्यंत अनुदान मागणीचे १५ हजार १०२ अर्ज महापालिकेकडे आले आहेत. त्यातील १२ हजार २९० अर्ज मंजूर झाले आहेत. पैकी ११ हजार ७६५ स्वच्छतागृहे बांधून झाली आहेत. त्यासाठी एकूण ६ कोटी १२ लाख ८८ हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. त्यातील सात हजार ६६१ लाभधारकांना पूर्ण अनुदान तर, ८८६ लाभधारकांना अनुदानाचा पहिला हप्ता आठ हजार रुपये देण्यात आला आहे. 

Web Title: Hagandati free city Pimpri Chinchwad Municipal