शतकवीर आजीबाईंकडून मतदानाचे अर्धशतक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

वयाचे शतक पूर्ण केलेल्या मुळशी तालुक्‍यातील वाळेण येथील सरूबाई शंकरराव साठे या मतदान करण्याच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध निवडणुकांत 49 वेळा मतदान केले आहे. आजही त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत उत्साहात मतदान केले. 

कोळवण (पुणे) : वयाचे शतक पूर्ण केलेल्या मुळशी तालुक्‍यातील वाळेण येथील सरूबाई शंकरराव साठे या मतदान करण्याच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध निवडणुकांत 49 वेळा मतदान केले आहे. आजही त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत उत्साहात मतदान केले. त्यांच्या या उत्साहाचे गावातील तरुणांसह सर्वांनीच कौतुक केले. 

सरूबाई साठे या वाळेणचे माजी सरपंच मोहनराव साठे यांच्या आई आहेत. त्यांचे वय 110 वर्षे आहे. या वयातही त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा मोठ्या उत्साहाने हक्क बजावला. त्यांनी आपला मुलगा, सून, नातू, नातसुना यांच्यासोबतीने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. संपूर्ण साठे कुटुंब या वेळी उपस्थित होते. 

विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सरूबाई यांचे वय 109 वर्षे होते आणि मतदारयादीत त्यांचा अनुक्रमांकही 109 होता. त्यांनी आतापर्यंत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा अशा प्रत्येक निवडणुकीवेळी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half a century of voting by a woman in Mulshi