भुसार बाजारात हमालांचा संप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

हमालांनी बेमुदत संप पुकारला तरी मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजार बंद राहणार नाही. बाहेरून हमाल आणून काम सुरू ठेवणार आहे, अशी भूमिका दि पूना मर्चंट्‌स चेंबरने घेतली आहे.

मार्केट यार्ड - हमालांनी बेमुदत संप पुकारला तरी मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजार बंद राहणार नाही. बाहेरून हमाल आणून काम सुरू ठेवणार आहे, अशी भूमिका दि पूना मर्चंट्‌स चेंबरने घेतली आहे. दरम्यान, हमालांनी अचानक पुकारलेल्या बंदमुळेच बाजारात माल घेऊन आलेल्या १५० ते २०० गाड्या उभ्या आहेत. त्या खाली करण्यासाठी मंगळवारी (ता. ३०) बाहेरील ५० हमालांना बोलविले आहे. त्यामुळे चेंबर आणि महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ यांच्यातील वाद चिघळण्याची शक्‍यता आहे.

तोलणारांना गूळ, भुसार बाजारात कामावर रुजू करून घ्यावे, या मागणीसाठी हमालांनी सोमवारपासून (ता. २९) बेमुदत संप पुकारला. या पार्श्‍वभूमीवर चेंबरने पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका घेतली. त्या वेळी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव विजय मुथा, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठिया यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

ओस्तवाल म्हणाले, की पणन संचालंनी २०१४ मध्ये दिलेल्या आदेशानुसार, इलेक्‍ट्रॉनिक काटे आणि पॅकिंग स्वरूपात माल येत आहे. त्यामुळे तोलणारांची गरज नाही. न्यायालयीन लढाईनंतर हा आदेश लागू झाला आहे. त्यामुळे या प्रश्‍नासाठी हमाल पंचायतने पुकारलेला संप बेकायदा आहे. 

हमाल पंचायत अवघ्या ३३ तोलणाऱ्यांसाठी ६०० व्यापारी आणि तीन हजार हमालांना वेठीस धरले आहे. चेंबर आणि हमाल पंचायतीच्या करारानुसार संप पुकारताना ४८ तास आधी पूर्वसूचना देणे आवश्‍यक आहे. मात्र त्याचे पालन झालेले नाही. त्यामुळे येथील व्यापार, शहरातील अन्नधान्य पुरवठा विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. संपामुळे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. माल भरून आलेल्या गाड्या उभ्या आहेत. सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. काही नुकसान झाल्यास त्याला हमाल पंचायत जबाबदार आहे.

माल भरून देण्यास तयार
मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात जरी हमालांनी बंद पुकारला, तरी बाजार सुरू आहे. खरेदीदारांनी खुशाल खरेदीस यावे, व्यापारी माल भरून देण्यास तयार असल्याचे चेंबरने सांगितले आहे. दरम्यान, बाजार समिती प्रशासनानेही गरज लागली तर पोलिस संरक्षण देणार आहे, असे चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
तोलणाऱ्यांना कामावर न घेण्याचा निर्णय दि पूना मर्चंट्‌स चेंबरने परस्पर घेतला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली असून निर्णय दोन दिवसांत झाला नाही, तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
डॉ आढाव म्हणाले, की इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजन काटे असणाऱ्या दुकानात तोलाईत कपात करू नये, असे आदेश तत्कालीन पणन संचालक सुभाष माने यांनी २०१४ मध्ये दिले होते. मात्र ते देताना बाजार घटकांना विचारात घेतले नाही. बाजार समितीला म्हणणे मांडण्याची संधी दिली नसल्याचे माने यांच्या लक्षात आणून देत या आदेशात बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही. तर तोष्णीवाल यांची तोलाईप्रश्‍नी नेमलेल्या अभ्यास समितीच्या सुनावण्या झाल्या. त्याचा अहवाल जाहीर केला जात नाही. पाठपुरावा करूनही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे भुसार बाजारात हमालांनी बेमुदत बंद पुकारला आहे. यावर निर्णय न घेतल्यास राज्याव्यापी आंदोलन करावे लागेल. हमालांच्या आंदोलनाबाबत दि पूना मर्चंट्‌स चेंबरसह बाजार समितीला देखील कळविले होते. चेंबरने कोणत्याही आदेशाविना तोलणाऱ्यांना परस्पर कामावर न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. चेंबर बाहेरून हमाल आणून काम करून घेणार असेल, तर आंदोलन राज्यव्यापी होईल. बाहेरचे हमाल आणणे म्हणजे संघटना फोडण्याचा डाव आहे. त्यामुळे आम्हीही बाहेरच्या हमालांना प्राणपणाने विरोध करू, असा इशाराही डॉ. आढाव यांनी दिला.

सेस चोरीसाठीच तोलणार नको
सध्या बाजारात पॅकिंग शेतीमालाची आवक होत आहे. वजनमापासाठी इलेक्‍ट्रॉनिक काट्यांचा वापर होतो. पुण्याचा भुसार बाजार हा बंदिस्त नसल्याने तोलणाऱ्यांकडूनच वजनमाप केल्याने अचूक व सुलभतेने माहिती मिळते, असा अहवाल समितीने जिल्हा उपनिबंधकांना दिला आहे, असे डॉ. आढाव यांनी सांगितले. तर तोलणाऱ्यांच्या कामामुळे सेस चोरीस अडथळा ठरतो. त्यामुळे व्यापाऱ्यांना तोलणार नको, असल्याचे तोलणारांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hamal strike in pune marketyard