शेकडो पुणेकरांकडून मायेचा हात

Pune-Lockdown
Pune-Lockdown

‘नसे राऊळी वा नसे मंदिरी, जिथे राबवी हात तेथे हरी’ या ओळींचा अर्थ पुणेकरांनी गेल्या दोन महिन्यात पावलोपावली अनुभवला. विपरीत परिस्थितीतून पुण्याला सावरण्यासाठी शेकडो पुणेकरांचे हात पुढे येत आहेत... कुणी जेवणाची हजारो पाकिटे तयार केली, कुणी किराणा मालाच्या थैल्या दिल्या...नकारात्मकतेला छेद देत विलक्षण सकारात्मक उर्जा राबणाऱ्या हातांनी पुण्यात तयार केली. त्यांची दखल प्रातिनिधिक दखल इथे घेत आहोत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रोज ९०० जणांना जेवण 
नदीपात्रात मजूर असल्याचं समजल्यानं 24 मार्चला 200 जणांचं जेवण आमच्या मंडळातच तयार करून नेलं. त्यानंतर तिथं मजुरांची संख्या वाढत गेली आणि रोज 900 जणांना आम्ही जेवण देत गेलो. आतापर्यंत 24 हजार अन्नपाकिटं आम्ही वाटली. कोणत्याही कार्याची सुरवात पुण्यात ग्रामदैवत कसबा गणपतीपासनं होते. त्याच कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी आपल्या मंडळाचे प्रयत्न ‘सकाळ’कडं नोंदवले. मंदिराच्या आसपास आश्रयाला आलेल्या 150 जणांच्या जेवणाची व्यवस्था केली.  

महिलेला तत्काळ आधार 
कोणाला कसलीही मदत लागली तर फोन करा, असे सांगत आम्ही हेल्पलाइन नंबर दिले होते. एके दिवशी वारज्यातील एका महिलेचा फोन आला. उदबत्त्या विकून आपल्या दोन मतिमंद मुलांचं पोट भरणाऱ्या आणि पती नसलेल्या एका महिलेचा तो फोन होता. तिला आम्ही महिन्याचा शिधा पोचवला... वंदेमातरम संघटनेचे प्रमुख वैभव वाघ सांगतात. पालिकेच्या केंद्रांमध्ये राहणारे मजूर तसंच आठ शाळांमधल्या विलगीकरण कक्षांत ठेवलेल्या संशयितांना अन्नाची पाकिटं द्यायला आम्ही सुरवात केली. आतापर्यंत एक लाख 60 हजार पाकिटं गरजवंतांना पोचवली. अडीच हजार शिधाथैल्या गरजूंपर्यंत नेल्या. रक्तपेढ्यांसाठी 150 कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं. मणिपूर राज्यातले 200 विद्यार्थी पुण्यात असल्यानं त्यांनाही अन्नाची पाकिटं दिली. याकामी आम्हाला गुरूद्वार, गुरू गौतममुनी चॅरिटेबल ट्रस्ट, सरहद संस्थेनंही मदत केली. उद्योगपती पुनीत बालन यांनी पाण्याच्या 30 हजार बाटल्या दिल्या. 

ताईची जेवणाची सोय झाली... 
नांदेडहून एकाचा फोन आला... आमची ताई पुण्याला शिकायला एकटी आहे. लॉकडाऊनमुळं मेस बंद झाली. आता तिच्या जेवणाचं कसं होणार, हा प्रश्न होता. तुमच्यामुळं तो सुटलाय. बुधवार पेठेतल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष मोहिते माहिती देत होते. परगावातील विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन सोशल मीडियावर केलं. त्याला प्रतिसाद देत 233 मुलांनी नोंदणी केली. त्यातल्या 150 जणांना भाजी-पोळी-भात असं जेवण दिलं. एक मुलगा एकाच कपड्यावर येत असल्याचं लक्षात आल्यानं आनंद सराफ यांनी त्याला कपडे दिले. ट्रस्टचे अध्यक्ष शिवराज कदम, युवराज गाडवे तसेच डॉ. मिलिंद भोई यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. 

समाजातील कलावंतांसाठी... 
भाऊ, आम्ही कलावंत आहोत, कुणापुढं हात पसरायचा नाही, अशी आमची वृत्ती असते. पण आमची हलाखीची स्थिती तुम्ही ओळखली, खूप खूप धन्यवाद... लोककलावंत प्रवीण सूर्यवंशी डोळ्यांत पाणी आणून शाहीर हेमंत मावळे यांना फोनवर सांगत होते. मावळे यांनी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे कलेवर पोट असलेल्या कलाकारांना मदतीचा हात दिला. 14 वस्तूंची थैली करून 40 कलाकारांना घरपोच दिले. या उपक्रमांसाठी अनेकांनी मदत केली, त्यात अमेरिकेहून शंतनू देसाई यांनी पाठवलेल्या 11 हजार रुपयांचाही समावेश होता.

फुगे विकणाऱ्या मुलांसाठी... 
लॉकडाऊनमुळं वाहनंच थांबली. त्यामुळं सिग्नलला फुगे विकणाऱ्या मुलांचे फुगे कोण घेणार आणि त्यांचं पोट कसं भरणार... हा प्रश्न पडला भांडारकर रस्त्यावरील नवयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील पांडे आणि त्यांच्या इतर सदस्यांना. मग त्यांनी नदीपात्रात मुक्कामाला असलेल्या 350 कुटुंबांना आधार दिला. तसचं मंडळानं पुरंदर, वेल्हे, मुळशी, मावळमधल्या छोट्या गावांतल्या रहिवाशांसाठी धान्य जमा केलं. त्यासाठी रंगाकाका कुलकर्णी भक्त मंडळानं त्यांना मदत केली. काळकराई, निगडे, मोसे, अंबेड, शिरकोली या गावांचाही त्यात समावेश होता. 

जैन समाजातर्फे अन्नपाकिटं 
जैन समाजाच्या चारही संप्रदायातील संस्थांनी एकत्र येऊन पुण्यात 10 हजार अन्नपाकिटं अन 50 हजार शिधा-थैल्या देण्याची व्यवस्था केली. शहरात 21 केंद्रे यांसाठी त्यांनी सुरू केली. या उपक्रमाचे एक संयोजक अचल जैन यांनी सांगितले की समाजातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन हातावर पोट असलेल्यांसाठी काहीतरी करायचं ठरवलं. आम्ही तीन पोळ्या, एक भाजी, मसालेभात असं जेवण द्यायला सुरवात केली. समाजाच्या विविध 60 मंदिरं-मंडळांनी त्यासाठी मदत केली. दगडखाण कामगारांनाही 200 पाकिटं देण्यात आली. 

मेट्रोच्या कामगारांसाठी... 
लॉकडाऊनमुळं मेट्रो, बीआरटीचं काम बंद पडलं. त्यांचं काम करणाऱ्या कामगारांच्या तसंच इतरही मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी सातारा रस्त्यावरच्या शंकर महाराज मठानं पुढाकार घेतला. नदीपात्रात कामगार बसून असल्याची बातमी वाचून हा उपक्रम सुचल्याचं ट्रस्टचे विश्वस्त प्रताप भोसले सांगतात. मंदिर 18 मार्चला बंद झाल्यानं प्रसाद वाटपही बंद झालं. त्यामुळं 25 मार्चपासनं मूगडाळीच्या खिचडीचं वाटप त्यांनी सुरू केलं. आता चार हजार जणांना अन्न दिलं जातंय. लोहगाव पोलिस स्टेशन, जनता वसाहत तसंच बीआरटी-मेट्रोच्या कामगारांना ती दिली जाते. याशिवाय, 10 लाख रुपये मुख्यमंत्री निधीला तर पाच लाख रुपये ससून रूग्णालयाला दिल्याचंही त्यांनी सांगितलं. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मामाच्या गावाची सफर रद्द, पण... 
शुक्रवार पेठेतल्या सेवा मित्र मंडळ अनाथालयातील चिमुकल्यांना दर मे महिन्यात मामाच्या गावाची सफर आयोजित करते. या मुलांना मंडळात आणून तीन-चार दिवस जादूचे प्रयोग, संगीत, आइस्क्रीम पार्टी असे वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. यंदा ही सहल रद्द करावी लागली, पण या मुलांसाठी त्यांच्या संस्थेत मंडळानं सात कडधान्यांचे कीट पोचवले; तसेच आमरस, लाडू, भेळ, बिस्किटं असा खाऊही पाठवला. अंजनीबाई मोहिते प्रतिष्ठानने ससूनच्या डॉक्‍टरांसाठी 150 सुरक्षा कीट दिले. 

माहेश्वरी समाजाकडून अन्न
आम्ही आतापर्यंत 60 हजार अन्नपाकिटं तसंच शिधा-थैल्यांचं वाटप केलंय; तसंच डॉक्‍टरांसाठी 600 फेसशिल्ड दिले आहेत, असं श्री माहेश्वरी समाजाचे सत्येंद्र राठी यांनी सांगितले. पुणे आणि पिंपरीत सहा केंद्रे सुरू केली. त्यातल्या आचाऱ्यांना शिधा पोचवला जातो. विद्यार्थी सहायक समितीलाही 500 अन्न पाकिटं दिली. पायानं दाबून सॅनिटायझर मिळण्याची व्यवस्था असलेली यंत्रही त्यांनी दिली आहेत. श्रीराम मंदिर ट्रस्ट, लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट, लोहिया परिवार संचलित श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांचाही सहभाग या उपक्रमात आहे. त्यांचे शरद सारडा, चंदन मुंदडा, घनश्‍याम लढ्ढा, पुरुषोत्तम लोहिया, रामकुमार राठी, राजेश कासट आदी त्यात मदत करत आहेत. 

गिर्यारोहकही मदतीला तयार... 
कोरोनाविरोधात लढण्यासाठीच्या टास्क फोर्समध्ये सहभागी व्हा, या सरकारच्या आवाहनाला गिर्यारोहकांनी प्रतिसाद दिला असून राज्यात सर्व जिल्ह्यांत पथक तयार केले आहे. गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक उमेश झिरपे सांगतात की, 18 ते 50 वयोगटातील सदस्यांना या पथकात सहभागी केले असून त्यांची नावं जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना पाठविली आहेत. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघामार्फत हे काम होत आहे. संस्थेच्या 150 सदस्यांनी पुण्यात रक्तदान केले असून कष्टकऱ्यांना तसेच आपलं घर संस्थेला अन्नधान्य दिले आहे. 

ढोल-ताशा महासंघातर्फे रक्तदान 
रक्ताचा तुटवडा असल्याचं समजल्यानंतर ढोल-ताशा महासंघानं पुण्यातील विविध पथकांना रक्तदानाचं आवाहन केलं, त्यानुसार अनेक कार्यकर्त्यांनी विविध रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान केल्याची माहिती महासंघाचे पराग ठाकूर यांनी दिली. तसेच, 24 तास नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसाठी चहा-नाष्टा यांची व्यवस्था शिवप्रताप वाद्य पथक ट्रस्ट आणि नारायण पेठेतील माती गणपती मंडळ ट्रस्टने केली. या पथकाचे सौरभ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यात पुढाकार घेतला. 

रा. स्व. संघाची तपासणीस मदत 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महापालिका आणि पुणे प्लॅटफॉर्म कोविड रिस्पॉन्स यांनी संयुक्तपणे आरोग्य सेवा रक्षा अभियान राबविले असून घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी करण्याचे काम करण्यात येते. संघाच्या पुणे महानगराचे प्रचारप्रमुख सुनील खेडेकर याबाबत सांगतात की, रेड झोनमध्ये डॉक्‍टर, संघाचे तीन स्वयंसेवक, महापालिका आणि पोलिस दलाचा एक कर्मचारी यांचे हे पथक आहे. या पथकाद्वारे रोज दीड हजार व्यक्तींची तपासणी होते. याशिवाय संघाने 40 हजार मास्क वाटले असून दीड हजार स्वयंसेवकांनी रक्तदान केले आहे. 

दगडूशेठ ट्रस्टतर्फे शिधा 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या वाड्यावस्त्यांपर्यंत किराणा मालाची पाकिटे पोचवण्याचं काम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं केलं. 10 हजार पाकिटं ट्रस्टने गोरगरीब जनतेपर्यंत पोचवली, असं ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सांगतात. पानशेत धरण, मुळशी तालुका, खेड-शिवापूर, सोमाटणे फाटा भागांतील गरिबांपर्यंत हा शिधा गेला. ससूनमध्ये रुग्णांच्या नातलगांना ट्रस्ट दररोज जेवण देते, त्याबरोबरच डॉक्‍टरांना तसेच परिचारिका, इतर कर्मचारी वर्गालाही जेवण देण्यास आम्ही सुरवात केली आहे. ट्रस्टच्या चार रुग्णवाहिका कोरोनाच्या रुग्णांची ने-आण करण्यासाठी दिल्या आहेत. 

पोलिसांना नाष्टा-चहा 
पोलिसांना नाष्टा-चहा देण्याचा उपक्रम अखिल मंडई मंडळाने राबवला. मंडळाचे कार्यकर्ते सूरज थोरात सांगतात की फरासखाना, त्या अंतर्गत येणाऱ्या पोलिस चौक्‍यांतील पोलिसांना तसेच रस्त्यावर बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना नाष्टा-चहा देण्याचा उपक्रम मंडळाने केला. मायनॉरिटी एज्युकेशन सोशल ट्रस्टचे प्रमुख एडविन रॉबर्ट यांनीही कोंढवा, शंकरशेट रस्ता, लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरातील पोलिसांच्या चहापाण्याची व्यवस्था केली. 

कुत्रीही मालकांनी सोडली
प्राण्यांमुळं कोरोना होतो, या चुकीच्या माहितीवर विसंबून काही मालकांनी अनेक वर्षे जीव लावून सांभाळलेली कुत्रीही रस्त्यावर सोडून दिली. आजच एक लॅब मला रस्त्यावर मिळाला... प्राणिप्रेमी सुजाता माटे यांचा हा संताप होता. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सेवा ग्रुप या संस्थेच्या त्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पथके शहराच्या वेगवेगळ्या भागांत जातात आणि भटके कुत्रे, मांजरींना खायला देतात. माझ्याकडे सदाशिव पेठ ते सारसबागेपर्यंतचा भाग आहे, त्यात 40-50 प्राणी रस्त्यावर आढळतात. आता त्यांना सवय झाल्यानं ते माझी वाट पाहात बसतात, असं माटे सांगतात.

धुणे-भांडी करणाऱ्यांना मदत 
लॉकडाऊनमुळं धुणं-भांडी करणाऱ्या महिलांना अनेक सोसायट्यांत प्रवेश बंद केला तर काही जणी लांब राहात असल्यानं त्यांना तिथं येताही येईना. त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नामदेव समाजोन्नती परिषद आणि प्रभात मित्र मंडळ. प्रभात मित्र मंडळाचे संदीप लचके सांगतात की धुणं-भांडी करणाऱ्या महिला, शिंपीकाम करणारे कारागीर, प्लंबर आदींचा विचार आम्ही केला; तसंच अन्नाची पाकिटं वाटली. तसंच आम्ही घेतलेल्या रक्तदान शिबिरात 61 पिशव्या रक्त जमा झालं. 400 जणांच्या तापाची तपासणीही आम्ही केली.

रोज हजार जणांना जेवण 
माझा मुलगा आणि पुतण्या काही दिवसांच्या अंतरानं गेले. त्यांच्या चौदाव्यासाठी केलेलं जेवण लॉकडाऊनमुळं कुणी न आल्यानं वाया गेलं. त्या पिशव्या बाहेर ठेवल्या होत्या. त्या एक भिकारी उघडून त्यातलं अन्न खात होता. ते पाहून मला वाटलं की आपण गरजूंना अन्न द्यावं... टिळक रस्त्यावरच्या गिरिजा हॉटेलचे मालक दादा सणस सांगत होते. गिरिजा ग्रुप आणि निनाद संस्थेनं त्यात पुढाकार घेतला. त्यांनी महापालिकेच्या केंद्रांमध्ये ठेवलेल्या मजुरांना खिचडी द्यायला सुरवात केली. सुमारे एक हजार जणांचं जेवण ते रोज देत गेले. तसेच त्यांना प्रोटिन मिळावं, यासाठी भाजी-पोळीही सुरू केल्याचं निनादचे उदय जोशी सांगतात. 

स्वरूपवर्धिनीच्या मुलांना मदत 
स्वरूपवर्धिनी संस्थेतील दोन हजार मुलांपैकी बहुसंख्य मुलांचे पालक हे कष्टकरी आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्यानं संस्थेनं समाजाला मदतीचं आवाहन केलं. अगदी सामान्य पुणेकरांनी त्यात मदत केल्याने 17 लाख रुपयांचा निधी जमला. त्यातनं 1700 घरांमध्ये धान्याचे कीट दिल्याचे संस्थेचे कार्यवाह ज्ञानेश पुरंदरे सांगतात. संस्थेत असलेल्या शालेय मुलांसाठी प्रश्नमंजूषा-गीतं-भाषणं असा व्यक्तिमत्त्व विकासाचा कार्यक्रम; तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करियर संवादमाला असे कार्यक्रम राबविले.

सफाई कामगारांना गोळ्या 
सफाई कामगार धोकादायक स्थितीत काम करत असल्यानं त्यांची प्रतिकारशक्ती वाढवणं महत्त्वाचं असतं. अशा 700 कामगारांना लिंबराज महाराज ट्रस्ट आणि आम्ही पुणेकर या संस्थांनी गोळ्या दिल्या. ट्रस्टचे विश्वस्त अखिल झांजले यांनी सांगितले की त्याचबरोबर सिंहगड रस्ता, बाणेर रस्ता, तुळशीबाग, दांडेकर पूल परिसरातील 300 जणांना पुलाव-भाजी-पोळी असे जेवण देण्याचा उपक्रमही आम्ही राबवला. तसेच धान्याच्या कीटचेही वाटप केले.

रिक्षावाल्या काकांना हजार रुपयांची मदत 
रिक्षावाल्या काकांनी आपल्या मुलांना शाळेत सोडलं आहे. त्यांची आठवण ठेवायला हवी, असा विचार करून त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्याचा संकल्प आम्ही सोडला. युवास्पंदन संस्थेचे संस्थापक चेतन धोत्रे सांगत होते. प्रथम शंभर रिक्षाचालकांना मदत द्यायची ठरवून एक लाख रुपये जमवायचं ठरवलं, मात्र पावणेदोन लाख रुपये जमले. त्यामुळे 175 जणांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्याचा कार्यक्रम आम्ही आखला. त्यासाठी 550 रिक्षाचालकांची माहिती आली. गरजवंतांची नावे निश्‍चित केली. हा संकल्प समजल्यावर काही रिक्षाचालकांची जबाबदारी घ्यायलाही काही नागरिक पुढे येत आहेत.

इस्कॉनकडून रोज 90 हजार अन्नपाकिटं 
कष्टकऱ्यांना जेवू घालण्याचं पुण्यातलं बहुधा सर्वांत मोठं काम हे इस्कॉनकडून होतं आहे. रोज तब्बल 90 हजारांपर्यंत अन्नपाकिटं या संस्थेनं वाटली आहेत. याबाबत इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनचे संचालक संजय भोसले सांगतात की, लॉकडाऊन सुरू झाल्यावर प्रत्येक सदस्याने नऊ परिवारांना जेवण देण्याचं ठरवलं. ही संख्या दुसऱ्या दिवशी अडीच हजारांवर तर तिसऱ्या दिवशी पाच हजारांवर गेली. ती वाढत 90 हजारांपर्यंत पोचली. पिंपरी, स्वारगेट आणि कोंढव्याचे मंदिर येथे प्रत्येकी 400 ग्रॅमचं पाकीट केलं जातं. त्याचप्रमाणे पाच हजार जणांसाठी पोळी-भाजी देण्याचा उपक्रमही आम्ही राबवला. या अन्नाच्या वितरणाचा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने सोडवला. परिषदेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत विशेष संपर्कप्रमुख किशोर चव्हाण यांनी सांगितले की, अन्नाची पाकिटं वाटण्यासाठी 15 वाहने तयार ठेवली. इस्कॉनच्या 45 हजार पाकिटांचे वितरण कार्यकर्ते करतात. 

ओघ मदतीचा...

  • ४५ लाख पुण्याची अंदाजे लोकसंख्या
  • ४० टक्के पुण्यातील झोपडपट्टीवासीय
  • १ लाख १८ हजार कामगारांच्या राहण्याची ११४ निवासी छावण्यात सोय
  • ४५ ते ५०,००० विविध संघटनांनकडून रोज वाटली जाणारी जेवणाची पाकिटे
  • १५ हजार ८५० विविध बांधकाम प्रकल्पावरील मजुरांना अन्नवाटप
  • ३१ शाळांत १६०० परप्रांतीय, ८०० स्थानिक कामगारांना निवारा

संकलन - सुनिल माळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com