धायरीकरांचा हंडा मोर्चा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

धायरीला पाणीपुरवठा करण्यासाठी पुरेशी सक्षम यंत्रणा नाही. रायकरमळ्यात बांधलेल्या पाण्याच्या टाकीला लिकेज आहे. ते काढणे गरजेचे आहे. तसेच, धारेश्‍वर मंदिर परिसरातील पाण्याच्या टाकीपर्यंत एक्‍स्प्रेस लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. पॉइंट काढण्याचा निर्णय धोरणात्मक असून, तो वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. 
- सुनील अहिरे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

सिंहगड रस्ता - आमच्या हक्काचे पाणी आम्हाला तत्काळ द्या, नाहीतर आत्मदहन करू, असा इशारा धायरीतील नागरिकांनी सोमवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिला.

वडगाव पुलाजवळील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर नागरिकांनी हंडा मोर्चा काढला. धायरीतील काळभैरवनाथ मंदिरापासून मोर्चास सुरवात झाली. दरम्यान, पाणीपुरवठा विभाग उपअभियंता सुनील अहिरे यांना नागरिकांनी निवेदन दिले. आम्हाला कसे आणि कधी पाणी मिळणार, ज्या सोसायट्यांना पाण्याचे कनेक्‍शनच नाही, त्यांना पाणीपुरवठा कसा करणार, पाणी मिळाले नाही, तर आत्मदहन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. मोर्चात महिला व लहान मुलेही सहभागी झाली होती. या वेळी राष्ट्रवादी काँग्रसचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, रूपाली चाकणकर, स्वाती पोकळे, महेंद्र भोसले, सचिन बेनकर, संदीप चव्हाण, बाळासाहेब रायकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handa March for Water