आयुक्‍त बंगल्यावर लालटोपीनगरकरांचा 'हंडा मोर्चा'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

येथील लालटोपीनगर परिसरात काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही समस्या सुटलेली नाही. यामुळे संतप्त महिलांनी पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (ता. 10) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बंगल्यावर "हंडा मोर्चा' काढला.

पिंपरी - येथील लालटोपीनगर परिसरात काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही समस्या सुटलेली नाही. यामुळे संतप्त महिलांनी पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (ता. 10) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बंगल्यावर "हंडा मोर्चा' काढला.

लालटोपीनगरमध्ये एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. मात्र, पाण्याचे नियोजन महापालिका करते. काही दिवसांपासून या भागात कमी दाबाने, अवेळी, अपुरा पाणीपुरवठा होत आहे. लोकप्रतिनिधींना सांगूनही प्रश्‍न सुटलेला नाही. त्यामुळे महिलांनी थेट आयुक्‍तांच्या बंगल्यावरच हंडा मोर्चा काढला. त्याची दखल घेऊन आयुक्‍तांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला व पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचा आदेश दिला. पाण्याचा टॅंकर उपलब्ध करून देण्यास सांगितले. थोड्याच वेळात पाण्याचा टॅंकर आल्याने महिलांनी पाणी भरण्यासाठी घरांकडे धाव घेतली.

महापालिकाच जबाबदार : एमआयडीसी
महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, एमआयडीसीकडून नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. आमच्या भागात पाण्याबाबतच्या तक्रारी नाहीत. मोरवाडी न्यायालयाजवळून 100 नळांचे कनेक्‍शन खूप वर्षांपासून आहे. यापूर्वी या भागातून कधीच तक्रार आलेली नाही. मात्र, महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यापासून तक्रारी येत आहेत. आम्ही कधीच पाण्याचा व्हॉल्व्ह बंद करीत नाही. यामुळे पाणीसमस्येला महापालिकाच जबाबदार आहे, असे एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत जोशी यांनी सांगितले.

एमआयडीसीचा खोडसाळपणा : महापालिका
एमआयडीसी एच-ब्लॉकला नेहमीच पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने मोरवाडी येथील व्हॉल्व्ह एमआयडीसी बंद करून ठेवते. यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होते. या भागात महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकली असून, तिची तपासणी सुरू आहे. महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर पाण्याची समस्या सुटणार असल्याचा विश्‍वास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अभिमान भोसले यांनी व्यक्त केला.

Web Title: handa morcha marathi news commission bunglow maharashtra news