दिव्यांगांच्या शाही रेशीमगाठी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

भावुकता अन्‌ हर्षोल्हास
मंगलाष्टके झाल्यानंतर सप्तपदी व कन्यादानाचा कार्यक्रम झाला. त्या वेळी दृष्टिहीन वर एका हाताने चाचपडत वधूचा भांग शोधून त्यात सिंदूर (कुंकू) भरत होते. अशाच पद्धतीने त्यांनी वधूंच्या गळ्यात सौभाग्याचे लेणे मंगळसूत्रही घातले. दोन सुहासिनी प्रत्येक जोडप्याजवळ जावून कन्यादान विधीबाबत सांगत होत्या. त्यांना मदत करीत होत्या. त्यांच्या सूचनेनुसार वधू-वर कृती करीत होते. पुरोहितांकडून मंत्रोच्चार सुरू होता. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. जीवनसाथी मिळाल्याचा आनंद होता.

पिंपरी - उद्यानातील हिरवळीवर मांडलेल्या खुर्च्या..., खुले व्यासपीठ..., त्यावर फुलांनी केलेली सजावट..., सनईचे सूर..., एका बाजूला भेट वस्तूंची रूखवत..., आजूबाजूला वावरणाऱ्या करवल्या आणि यजमानांची लगबग..., डोक्‍यावर फेटे..., नटूनथटून आलेली वऱ्हाडी मंडळी... आणि बफे भोजन पद्धती असा शाही थाट होता, दिव्यांगांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचा. 
निगडी-यमुनानगरमधील अपंग विद्यालयाच्या उद्यानातील हिरवळीवर रविवारी (ता. १०) ११ दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.

दुपारी सव्वाबाराचा मुहूर्त होता. पुरोहितांनी ‘स्वस्ती श्री गणनायकम्‌ गजमुखम्‌...’ म्हणताच वऱ्हाडी मंडळी सावध झाली आणि ‘शुभ मंगल सावधानऽऽऽ’ म्हणताच अक्षता डोईवर टाकून वधू-वरांना आशीर्वाद देत होते.

यात सर्व जाती धर्मातील लोक होते. खुल्या व्यासपीठावर विवाहेच्छू विराजमान होते. त्यांच्या उजव्या बाजूला हिरवळीवर ११ रूखवत मांडलेल्या होत्या. त्यात लोखंडी कपाट, पलंग, गादी, ताट, तांब्या, वाट्या अशा स्वयंपाक घरातील जिन्नसांसह केरसुणी, फनी, कंगवा, आरसा अशा गृहोपयोगी सर्व वस्तूंचा समावेश होता. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला बफे भोजन पद्धतीची तयारी होते. पंचपक्वांन्न होते. यासाठीचा खर्च लायन्स क्‍लबने उचलला होता. विवाहाचा घाट दिव्यांग प्रतिष्ठान आणि झूंज दिव्यांग संस्थेने घातला होता. विवाहेच्छू नाशिक, सोलापूर, मुंबई व लातूरहून आले होते. एका दिव्यांग (दृष्टिहीन) वराला आशीर्वाद देण्यासाठी मुस्लिम कुटुंब आले होते. आहेरासह हस्तांदोलन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘नाही हो, त्यांना कुणीच नव्हते. आमच्या शेजारीच राहतात. बरं झाले त्यांचं लग्न झालं. थोडी अपंग का असेना पण, डोळस बायको त्यांना मिळाली. आता तरी त्यांच्या जीवनातील अंधकार दूर होईल,’ अशी त्यांनी बोलकी प्रतिक्रिया अंगावर शहारे आणून गेली. 

झुंज दिव्यांग संस्थेचे संस्थापक राजू हिरवे म्हणाले, ‘‘दिव्यांग व त्यांच्या कुटुंबीयांना विवाह जुळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा व्यक्तींसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे माध्यम निवडले. यासाठी लायन्स क्‍लबचे मोठे सहकार्य मिळाले.’’ 

क्‍लबचे अशोक बनसोडे म्हणाले, ‘‘गेल्या दोन महिन्यांत दिव्यांगांच्या विवाहासाठी दोन राज्यस्तरीय परिचय मेळावा घेतले. त्यातून अकरा मुला-मुलींचे विवाह जुळून आले. एप्रिलमध्ये पाच जोडप्यांचा विवाह घडवून आणला होता.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: handicapped community marriage humanity