
भोंगे न उतरल्यास पोलिस ठाण्यांसमोर हनुमान चालिसा; मनसेचा पोलिसांना इशारा
पुणे : सर्वोच्च्य न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील सुमारे ४५० मशिंदीवरील अनधिकृत भोंगे उतरविण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा पोलिस ठाण्यांसमोर हनुमान चालीसा म्हणत आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांना गुरुवारी दिली. अजानला आमचा विरोध नाही. परंतु, भोग्यांद्वारे अजान नको, असेही मनसेने म्हटले आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘भोंगे हा सामाजिक विषय आहे. मशिंदीच्या जवळ राहणाऱ्या रहिवाशांना भोंग्यांचा त्रास होतो, याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबतचे आदेश दिले आहेत.
त्याची अंमलबजावणी पोलिसांनी करावी, अशी आमची भूमिका आहे. मशिंदीचे मौलवी आहेत, त्यांनी कायदा - सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांच्याच मध्यस्थीने पोलिसांना लेखी स्वरूपात ग्वाही देऊन कळवावे की, आमच्या मशिदीवरून अजान केली जाणार नाही. या पद्धतीने ग्वाही मिळाल्यास धार्मिक अथवा सामाजिक तेढ निर्माण होणर नाही. त्याची दखल पोलिसांनी घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा पोलिस ठाण्यांसमोर हनुमान चालिसा म्हणावे लागेल.’ या निवेदनावर मनसेचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते हेमंत संभूस, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रदेश उपाध्यक्ष रणजित शिरोळे, बाळा शेडगे, सरचिटणीस अजय शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Web Title: Hanuman Chalisa In Front Of Police Stations If Loudspeaker Not Removed Mns Warns Police Supreme Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..