अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

पुणे - ‘अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान’, ‘अंजनी के प्यारे हनुमानजी’ यांसारखी भक्तिगीते आणि चहूकडे घुमणारा ‘हनुमान चालिसा’ महामंत्र, अशा भावभक्तिपूर्ण वातावरणात शहरात मंगळवारी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी मंदिरांमध्ये पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

शहरासह उपनगरांमधील हनुमान मंदिरांना सोमवारी रात्रीपासून विद्युत रोषणाई केली होती. पहाटे पाच वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हनुमान जन्माचे कीर्तन संपल्यानंतर सहा वाजता मंदिरांमध्ये जन्मसोहळा उत्साहात पार पडला. त्यानंतर दर्शनास सुरवात झाली. सकाळी होमहवन, अभिषेक, हनुमान चालिसा महामंत्र आणि महाआरती यांसारखे धार्मिक विधी झाले. 

दर्शनासाठी लागलेल्या रांगा, प्रसाद वाटपासाठी कार्यकर्त्यांचे चाललेले प्रयत्न, भाविकांकडून हनुमानाच्या नावाचा होणार जयघोष, असे भक्तिपूर्ण वातावरण मंदिराच्या परिसरात होते. शनिवार पेठेतील दक्षिणमुखी मारुती मंदिर, सदाशिव पेठेतील भिकारदास मारुती, जिलब्या मारुती, तुळशीबाग राम मंदिरातील दास मारुती, बदामी हौद चौकातील बदामातील मारुती, अकरा मारुती मंदिर, डुल्या मारुती, सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती, पर्वती येथील मारुती मंदिर, शनिपार मारुती, नागनाथ पार येथील श्री गणेश मित्र मंडळ व सार्वजनिक हनुमान मंदिर, भवानी पेठेतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, ढोले पाटील रस्त्यावरील तरुण विकास मंडळाचे मंदिर, लष्कर भागातील खाण्या मारुती मंदिर व मंगळवार पेठेतील श्री हनुमान मंडळाच्या मंदिरात यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच साखळीपीर तालीम मंडळाच्या वतीनेही हनुमान जयंती साजरी करण्यात आली.

स्पर्धांचे आयोजन 
जयंतीचे औचित्य साधून पर्वती चढण्याची स्पर्धा घेण्यात आल्या. यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विश्‍वशांती केंद्र (आळंदी) व ‘एमआयटी’ शैक्षणिक संस्थेतर्फे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात ६५ मल्ल सहभागी झाले होते.

Web Title: Hanuman jayanti celebration