माझ्या सोबत असं पहिल्यांदाच घडलेः पालेकर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

माझ्या सोबत असे पहिल्यांदाच घडले असल्याची खंत अभिनेते अमोल पालेकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलून दाखविली. प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे त्यांच्या चित्रांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला पालेकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. पण पालेकरांना तिथे बोलू दिल नाही यावरून मोठा वाद झाला होता.

पुणे- माझ्या सोबत असे पहिल्यांदाच घडले असल्याची खंत अभिनेते अमोल पालेकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलून दाखविली. प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे त्यांच्या चित्रांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला पालेकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. पण पालेकरांना तिथे बोलू दिल नाही यावरून मोठा वाद झाला होता.

यावर आज पत्रकार परिषदेत पालेकर म्हणाले की, वारंवार अडथळे आणून मला थांबण्यास भाग पडले. एखाद्या वक्‍त्याला आमंत्रित करण्याआधी या कार्यक्रमात त्याने काय बोलणे अपेक्षित आहे, याची कल्पना त्याला आधीच करून दिल्यास त्या कार्यक्रमाला जायचे की नाही किंवा काय बोलायचे हे तोच ठरवेल. परंतु, असे न करता चालू भाषणामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने माझे भाषण थांबविण्यात आले. हे बोलू नका, यावर बोलू नका असे सांगण्यात आले. हे जर मला आधीच माहीत असते तर या कार्यक्रमाला जाण्यासच नकार दिला असता. ही एक प्रकारची मुस्कटदाबी आहे. असे मत अमोल पालेकर यांनी व्यक्त केले. यावेळी पालेकरांच्या पत्नी संध्या गोखलेही उपस्थित होत्या. 

सरकारवर टीका केली म्हणून अमोल पालेकरांचं भाषण थांबवलं(व्हिडिओ)

पालेकर म्हणाले, माझ्या सोबत असं पहिल्यांदाच घडलंय आहे. भाषणादरम्यान व्यत्यय आणून मला अशाप्रकारे थांबवलं जाईल याची पुसटशी कल्पनाही नव्हती. बर्वे यांच्यासारख्या कलाकाराला जाऊन आता 24 वर्षे झाली. त्यांची आठवण काढण्यासाठी 24 वर्षे लागली. इतका वेळ का लागला आणि ही त्यांना देण्यात येणारी शेवटची मानवंदना आहे. त्यामुळेच मी बोलत होतो. सल्लागार समितीचीही मुदत संपली आहे त्यानंतर आता समिती स्थापन होणार नाही तर सर्व निर्णय दिल्लीतून होणार असे आम्हाला माहिती झाले होते. यानंतर अशाप्रकारचे कुठले कार्यक्रमही होणार नाहीत, अशी माहिती मिळाली होती. यापूर्वी या गॅलरी संबंधीचे सर्व निर्णय यापुढे दिल्लीत बसून घेतले जातील. 

संध्या गोखले म्हणाल्या, या घटनेनंतर विरोध करणाऱ्यांवर अंकुश ठेवले जात असल्याची जाणीव झाली. पालेकरांनी स्पष्ट मत मांडल्यामुळे ज्यांचा आवाज दाबला जात होता अशा अनेकांनी त्यांचे आभार मानले. परंतु, आश्‍चर्य याचे वाटते की ही घटना होत असताना सभागृहातील एकानेही याला विरोध न करणे ही खेदाची गोष्ट आहे.

Web Title: This happened for first time with me says Palekar