मंगलमय आनंदपर्वाचा प्रारंभ

मंगलमय आनंदपर्वाचा प्रारंभ
मंगलमय आनंदपर्वाचा प्रारंभ

पुणे - कुलदैवतांसमोर विडा, दक्षिणा, सुपारी ठेवून पूजा करायची अन्‌ मंगलमूर्ती मोरयाची मूर्ती घरी आणायची...मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पद्धतीने "श्रीं‘ची प्रतिष्ठापना करून मोदकांचा नैवेद्य दाखवायचा...अथर्वशीर्षांचे पठण करीत बाप्पाच्या सेवेत रममाण व्हायचे...या मांगल्यमय गणेशोत्सवाची सुरवात उद्या (ता. 5) भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी शहरभर स्वागत कमानी उभारल्या असून, ढोल-ताशांचा निनाद, बॅण्डच्या सुरावटी आणि "बाप्पा मोरया‘चा जयघोष करीत आनंदपर्वाचा आज प्रारंभ होत आहे. 

मानाच्या गणपती मंडळांसहीत शहर व उपनगरांतील गणेश मंडळेही बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. बाप्पाच्या मिरवणुकीसाठी रथ, ढोल-ताशा आणि बॅण्ड पथके आणि पुरोहितांचे बुकिंग, देखावे, मंडपांतील सजावट ते अगदी प्रतिष्ठापनेसाठी मान्यवरांची वेळ घेण्यापर्यंत रविवारी कार्यकर्ते व्यग्र होते. तर घरच्या बाप्पासाठी कमळ, केवडा, शमी, दूर्वासहीत पूजेचे आणि सजावटीचे साहित्य खरेदीचा आनंद गणेशभक्तांनी घेतला. महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसर, पासोड्या विठोबा मंदिर परिसर, बोहरी आळी, तपकीर गल्ली, शनिवारवाडा येथे बहुसंख्येने आलेल्या नागरिकांनी विविध साहित्य खरेदीचा आनंद घेतला. रविवारी दुपारी चारनंतर बहुतांश गणेशभक्त "श्रीं‘ची मूर्ती वाजत गाजत घरी घेऊन जात होते.

पर्यावरणपूर्वक कापडी, लाकडी व थर्मोकोलची मखरे यांसह घरसजावटीसाठी गालिचा, सतरंज्या, पडदे तसेच नानातऱ्हेच्या सजावट साहित्यांनी सजलेल्या बाजारपेठेत भाविकांनी रविवारी तुंडुंब गर्दी केली होती. मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरून चालणे मुश्‍किल होत होते. मात्र तरीही अनेकांनी बाप्पासाठी चालणे पसंत केले. परिणामी गर्दीचा ताण मात्र पोलिसांसहीत कोणाच्याच चेहऱ्यावर दिसत नव्हता. रविवारी सकाळपासूनच उत्साही वातावरण पाहायला मिळत होते. प्रथेप्रमाणे कोणाकडे दीड, कोणाकडे पाच, तर कोणाकडे अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा असतो.

अठरा घाटांवर जीवरक्षक 

विसर्जनासाठी अग्निशामक दलातर्फेही घाटांवर जीवरक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे म्हणाले, ""एकूण 18 घाटांवर जीवरक्षक नेमले आहेत. प्रत्येक घाटावर दोन जीवरक्षक आणि एक जवान नियुक्त करण्यात येईल. त्यांना लाइफ गार्ड, लाइफ बॉय आणि दोरी आदी साहित्य पुरविण्यात येईल. लकडीपूल येथे दोरखंड बांधण्यात येणार आहे.‘‘ 

देखाव्यांत विविधता 

गणेश मंडळांनी मात्र यंदा विद्युत रोषणाईबरोबरच पौराणिक, वैज्ञानिक देखावे केल्याचे सांगितले. मेहूणपुरा मित्र मंडळाचे गिरीश सरदेशपांडे म्हणाले, ""इस्त्रोची स्थापना आणि क्षेपणास्त्र विकासात दिलेले अतुलनीय योगदान या विषयावर देखावा केला आहे.‘‘ तर मानाचा चौथा तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर म्हणाले, ""कलामहर्षी डी. एस. खटावकर यांना आदरांजली वाहण्याचे यंदा मंडळाने ठरविले आहे.‘‘ तर आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप म्हणाले, ""लोकमान्य टिळकांनी दिलेल्या स्वदेशीचा नारा हा देखावा साकार करीत आहोत.‘‘ 

साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा म्हणाले, ""तरुणांनी सैन्यात भरती व्हावे, हा संदेश देणारा जिवंत देखावा दाखविण्यात येणार आहे.‘‘ 

पूजेच्या साहित्य खरेदीचा आनंद 

या उत्सवादरम्यान येणाऱ्या ऋषिपंचमी पूजा, ज्येष्ठा गौरी पूजन, गणेश याग, अनंत पूजा आदी विविध धार्मिक पूजेचे साहित्यदेखील खरेदीचा मुहूर्त साधला. चतुर्दशीला साडेचारच्या ब्राह्म मुहूर्तापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत "श्रीं‘च्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे. त्यामुळे मुहूर्तावर बाप्पाची प्रतिष्ठापना करायची म्हणून मिळेल त्या वाहनाने बाजारहाट करण्यासाठी भाविक मध्यवर्ती पुण्यात येत होते. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्याचा ताण पोलिसांच्या चेहऱ्यावर मात्र दिसत होता. बाप्पाचे आवडते कमळ, केवडा, तांबड्या जास्वंदीची फुले, तुळस, शमी यांसह विड्याची पाने, नारळाची विक्री करण्यासाठी तुळशीबाग, हुतात्मा बाबू गेनू चौक, नऊ ऑगस्ट क्रांतिदिन चौक येथे पथारीवाल्यांनी दुकाने थाटल्याने या परिसरात खरेदी-विक्री उत्साह होता. बाप्पाला रुमाल, केवडा, कमळ दहा रुपये अशी आरोळी सातत्याने भाविकांच्या कानावर पडत होती. 

यंदा "बाजीराव‘ पेहराव्यात गणराय 

गणेशोत्सवावर दरवर्षीच चित्रपट माध्यमाचा प्रभाव जाणवतो. त्यामुळे यंदा बाजीराव मस्तानी चित्रपटावरून खास "बाजीराव‘ पेहराव्यातील मूर्तींचे आकर्षण भाविकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यातुलनेत जय मल्हार, बाहुबली आदी मूर्त्यांची आवड काहीशी कमीच झाल्याचे विक्रेते सांगत होते. विक्रेते मंगेश कर्वे म्हणाले, ""घरच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी बहुतांश भाविक नऊ इंची मूर्ती पसंत करतात. विशेषतः चार हात सुट्टे पाटावर किंवा चौरंगावर बसलेल्या मूर्तीला दरवर्षीच मागणी असते. भाविकांच्या आवडीनुसार आणि परवडतील अशा दरांमध्ये साधारणतः दोनशे, अडीचशे रुपये किमतीपासून मूर्ती आहेत.‘‘

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com