उलाढालीत हापूसच राजा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - नीलम, तोतापुरी, लालबाग, चौसा, केशर, बदाम, दशहरी, लंगडा अशा विविध प्रकारच्या आंब्यामुळे पुण्याच्या बाजारात वर्षातील आठ महिने आंबा उपलब्ध असतो. मात्र, आंब्याच्या उलाढालीत हापूसच "राजा' असून, इतर जातींच्या आंब्याचा वाटा 20 टक्के इतका आहे. 

पुणे - नीलम, तोतापुरी, लालबाग, चौसा, केशर, बदाम, दशहरी, लंगडा अशा विविध प्रकारच्या आंब्यामुळे पुण्याच्या बाजारात वर्षातील आठ महिने आंबा उपलब्ध असतो. मात्र, आंब्याच्या उलाढालीत हापूसच "राजा' असून, इतर जातींच्या आंब्याचा वाटा 20 टक्के इतका आहे. 

फळांचा राजा असलेल्या आंब्याचा हंगाम बहरात आला आहे. दहाहून अधिक प्रकारचे आंबे बाजारात उपलब्ध आहेत. ग्राहकांची सर्वांत जास्त पसंती हापूसलाच आहे. किमतीमुळे उच्च मध्यमवर्गीय अथवा मध्यमवर्गीय हाच हापूसचा ग्राहक असून, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गातील ग्राहकांना इतर राज्यातील आंबा हा चांगला पर्याय वाटतो. हा ग्राहक लक्षात घेऊन पुण्यात आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यातून तसेच उत्तर भारतातील काही राज्यातून नीलम, मल्लिका, चौसा, लालबाग, दशहरी, लंगडा आदी प्रकारातील आंबे विक्रीला आणले जातात. साधारणपणे आंब्याचा हंगाम हा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होतो, तो ऑगस्टपर्यंत बहरात असतो. त्यापैकी मार्च ते मे हा कालावधी हा हापूसचा मानला जातो. हा कालावधी वगळता इतर प्रकारचे आंबे बाजारात उपलब्ध असतात. बाजारात आंब्याची एकूण उलाढाल लक्षात घेता, हापूसचा वाटा 80 टक्के आणि इतर आंब्याचा वाटा हा 20 टक्के आहे. 

हापूसचा भाव परवडत नसलेला ग्राहक इतर प्रकारच्या आंब्याकडे वळतो. सर्व प्रकारच्या आंब्याची चव ही गोड असून, प्रत्येकाचा एक ठरलेला ग्राहकवर्ग आहे. 
बिलाल चौधरी, व्यापारी 

प्रत्येक राज्यातील आंब्याचा हंगाम हा वेगवेगळा आहे. त्यामुळे बाजारात फेब्रुवारी महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत आंबा उपलब्ध असतो. हापूसपाठोपाठ, केशर, बदाम या आंब्यांना मागणी असते. 
रोहन उरसळ, व्यापारी 

हापूस आंब्याचा ज्यूस करून विकणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ग्राहकालाही ज्यूस घेणे परवडणार नाही. त्यामुळे ज्यूससाठी आम्ही हापूस सोडून इतर जातीचा आंबा वापरतो. 
राज शेख, ज्यूस विक्रेता

Web Title: hapus mango pune news