हापूस अजूनही आवाक्‍याबाहेरच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

आंबा महोत्सवाचे आयोजन
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार्याने श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव बुधवारपासून (ता. १८) बाजार आवारातच होणार आहे. हापूसच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळण्यासाठी असोसिएशनतर्फे सोशल मीडियाद्वारे जागृती केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष विलास भुजबळ आणि सचिव रोहन उरसळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. आंबा उत्पादकांना महोत्सवासाठी सहकार्य केले जाईल, असे समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांनी या वेळी नमूद केले.

पुणे - कोकणातील हापूस आंब्याचे भाव आवाक्‍यात येण्यासाठी सर्वसामान्यांना आणखी दहा ते पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे. आवक कमी असल्याने सध्या हापूसचे दर जास्त आहेत. अक्षय तृतीया सण असल्यामुळेही आंब्यांकरिता जास्त पैसे मोजावे लागत आहेत. 

अक्षय तृतीया सण दोन दिवसांवर आला आहे. अद्याप बाजारातील आवक वाढलेली नाही. हवामानाने साथ न दिल्याने आंब्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचा दावा बागायतदार करीत आहेत. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. त्यामुळे हापूसच्या चार ते सहा डझनाच्या पेटीचा भाव हा दोन हजार ते साडेचार हजार रुपये आहे. तयार हापूस आंब्यांच्या डझनाचा भाव साडेसातशे ते दीड हजार रुपये आहे, असे व्यापारी करण जाधव यांनी सांगितले. 

हवामानाने साथ न दिल्याने फळांची वाढ व्यवस्थित झाली नाही, काही भागात कैरी छोटी असतानाच ती गळण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचा फटका बसला आहे. केवळ पुणेच नाही, तर इतर बाजारपेठांतही हापूस आंब्यांची आवक कमीच आहे. दहा ते पंधरा दिवसांनंतर आवक वाढेल, असा अंदाज आहे. त्याकाळात कच्च्या आंब्यांची आवक वाढेल आणि भाव कमी होऊ लागतील असाही अंदाज आहे. त्यामुळे पुणेकरांना कोकण हापूसची गोडी चाखण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. फळबाजारात रविवारी (ता. १५) रत्नागिरी, देवगड, रायगड भागातून आंब्याची चार ते साडेचार हजार पेटी इतकी आवक झाली. गेल्या आठवड्यात प्रतिदिन दोन ते अडीच हजार पेटी इतकी आवक झाली.

Web Title: hapus mango rate