हापूसचा भाव आवाक्‍यात येणार? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

पुणे - गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचे घाऊक बाजारातील भाव कमी निघाले आहेत. कर्नाटक हापूसचे भाव यंदा साधारणपणे पाचशे आणि रत्नागिरी हापूसचे भाव एक हजार रुपये कमी आहेत. यामुळे यंदाच्या हंगामात त्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात लवकर येण्याची शक्‍यता आहे. 

पुणे - गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचे घाऊक बाजारातील भाव कमी निघाले आहेत. कर्नाटक हापूसचे भाव यंदा साधारणपणे पाचशे आणि रत्नागिरी हापूसचे भाव एक हजार रुपये कमी आहेत. यामुळे यंदाच्या हंगामात त्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात लवकर येण्याची शक्‍यता आहे. 

या वर्षी जानेवारी महिन्यापासूनच कोकण हापूस आंब्याची तुरळक आवक बाजारात सुरू झाली होती. गेल्या महिन्यात केरळमधील हापूस, बदाम आदी प्रकारच्या आंब्यांचे आगमन जोरात झाले. या आंब्यांपाठोपाठ कर्नाटकातील आंब्यांची आवक वाढली. आता कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढू लागली आहे. कोकण आणि कर्नाटक हापूस आंब्यांचे यावर्षीचे भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी निघाले आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्यांची खरेदी वाढते, त्यामुळे रविवारी कर्नाटक आणि कोकण भागातील कच्च्या आंब्यांची आवक शुक्रवारी आणि रविवारी चांगली झाली. हा आंबा गुढीपाडव्यापर्यंत खाण्यास योग्य होईल, त्यामुळे विक्रेते आणि घरगुती ग्राहकांकडून मागणी होती. तुलनेत किमतीत कमी असणाऱ्या कर्नाटक हापूस आंब्यांचा हंगाम हा एप्रिल महिन्यात सुरू होतो, तो या वर्षी एक महिना आधीच सुरू झाला आहे. 

याबाबत व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, ""केवळ पुणेच नाही, तर मुंबईतील बाजारातही कर्नाटक हापूस आंब्याची आवक चांगली होत आहे. तेथील हवामानामुळे यंदा आंब्याचा हंगाम लवकर सुरू झाला आहे. पुढील काळात या आंब्याची आवक वाढत जाईल. रविवारी 3 ते 5 डझनाच्या सुमारे दीड हजार पेटी आणि एक आणि दोन डझनाचे सुमारे 2 हजार बॉक्‍स इतकी आवक झाली. त्याला 800 ते 1200 रुपये इतका भाव मिळाला असून, तयार मालाचे भाव यापेक्षा पाचशे ते हजार रुपयांनी जास्त निघू शकतात. गेल्यावर्षीपेक्षा हे भाव साधारणपणे पाचशे रुपयांनी कमी निघाले आहेत.'' 

कोकणातील आंब्याचा हंगाम या वर्षी चांगला असून, हवामानाने साथ दिली, तर पुढे त्याचे भाव आणि आवक टिकून राहू शकते, असा अंदाज व्यापारी रोहन उरसळ यांनी व्यक्त केला. 

केरळपाठोपाठ कर्नाटकचा हापूस आंबा बाजारात आल्याचा परिणाम बाजारावर पडला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कोकणातील हापूस आंब्याचे (कच्चा) भाव हे एक हजार रुपयांनी कमी आहेत. चार ते सहा डझन आंब्याच्या पेटीला प्रतीनुसार 1700 ते 2500 असा भाव मिळत आहे. हाच भाव गेल्यावर्षी 2700 रुपयांच्या पुढे होता. 
- रोहन उरसळ, व्यापारी 

Web Title: Hapus mango rate