हर्षवर्धन पाटील 12 ऑगस्टला करणार शक्तिप्रदर्शन!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्‍यातील गावभेटी दौऱ्यास सुरवात केली आहे. जिल्हा परिषद-पंचायत समिती गणानुसार गावभेटी करून गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत.

वालचंदनगर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्‍यातील गावभेटी दौऱ्यास सुरवात केली आहे. जिल्हा परिषद-पंचायत समिती गणानुसार गावभेटी करून गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत. तसेच ते येत्या सोमवारी (ता.12) इंदापूरमध्ये कार्यकर्ता मेळावा घेऊन ते जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

इंदापूरमधून खासदार सुप्रिया सुळे यांनी 70 हजारपेक्षा जास्त मताधिक्‍य मिळवून देण्यात हर्षवर्धन पाटील यांचा मोलाचा वाटा होता. लोकसभेप्रमाणेच राज्यात दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होण्याची दाट शक्‍यता आहे. मात्र, विद्यमान आमदारांच्या जागा ज्या-त्या पक्षाकडे राहाव्यात हे दोन्ही कॉंग्रेसमधील आघाडीचे सूत्र राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच जाहीर केले आहे. 

एखादी दुसरी जागा अपवाद म्हणून त्या जागेचा फेरविचार होऊ शकतो, असे सांगितल्याने इंदापूरच्या जागेचा पेच कायम राहण्याची शक्‍यता आहे. हर्षवर्धन पाटील हे विधानसभेची निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम असून निवडणुकीला दोन महिन्याचा अवधी राहिल्याने त्यांनी प्रचाराचे रणशिग फुंकले आहे. तालुक्‍यातील कार्यकर्त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी प्रत्येक रविवारी कार्यकर्त्यांशी थेट संवादाचा उपक्रम सुरू केला आहे. 

निमसाखर गणातील गाव भेट दौरा पूर्ण झाला असून, शुक्रवारपासून (ता. 2) दहा दिवसांमध्ये बाकी तालुका पिंजून काढणार आहेत. विधानसभेपूर्वी शक्तीप्रदर्शन करून विरोधकांना ताकद दाखवून देण्याचा पाटील यांचा प्रयत्न सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshavardhan Patil to show power on 12 August