नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या न्यायासाठी मुख्यमंत्र्याचा दरवाजा ठोठावु : हर्षवर्धन पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

भटकंतीमुळे जातीच्या दाखल्यापासुन व दाखल्याअभावी शासकिय लाभापासुन वंचित असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी त्यांना जातीचे दाखले मिळवुन देण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्याचा दरवाजा ठोठावु असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. 

भिगवण - शासनाच्या धोरणामुळे राज्यातील अल्पसंख्य समाजावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. भिक्षा मागुन जगणाऱ्या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील युवकांवर राईनपाडा येथे झालेला हल्ला हा माणुसकिला काळिमा फासणारा आहे. भटकंतीमुळे जातीच्या दाखल्यापासुन व दाखल्याअभावी शासकिय लाभापासुन वंचित असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी त्यांना जातीचे दाखले मिळवुन देण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्याचा दरवाजा ठोठावु असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. 

येथील दुर्गादेवी मंदिरामध्ये आयोजित नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप होते तर माजी सभापती रमेश जाधव, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अशोक शिंदे, कर्मयोगीचे संचालक यशवंत वाघ, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, पराग जाधव, नामदेव भोसले, शामराव परकाळे, रंगनाथ देवकाते, रणजित भोंगळे, सुनील काळे, सूर्यकांत सवाणे, संजय रायसोनी, प्रशांत वाघ उपस्थित होते. कार्यक्रमात राईनपाडा येथे मृत्यूमुखी पडलेल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर पुन्हा असा प्रसंग ओढवु नये यासाठी इंदापुर पंचायत समितीच्या वतीने नाथपंथी डवरी गोसावी समाजातील व्यक्तींना ओळखपत्र वितरण करण्यात आले. पाटील पुढे म्हणाले, शिक्षणाच्या माध्यमातून नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे भविष्य बदलु शकते. समाजातील मुलांना शिक्षणासाठी इंदापुर येथील वस्तीगृहामध्ये मुलांच्या शिक्षणाची मोफत सोय केली जाईल.

करणसिंह घोलप म्हणाले, इंदापुर तालुक्यामध्ये नाथपंथी डवरी गोसावी समाजाची मोठी संख्या आहे. समाजाच्या विकसासाठी पंचायत समिती खंबीरपणे उभी राहील तसेच राईनपाडा सारखे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना करु. यावेळी रमेश जाधव, अशोक शिंदे, बी.एन.शिंदे, शरद चितारे, अंकुश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विशाल शिंदे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. नवनाथ सावंत यांनी केले तर आभार अजय शितोळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, रमेश आहेर, विश्वनाथ आहेर यांनी केले.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Harshavardhan Patil Talks About Rainpada justice at Bhigwan Pune