इंदापूरच्या पाण्यासाठी हर्षवर्धन पाटील लढणार विधानसभा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

इंदापूर तालुक्‍यातील 11 टीएमसी पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवणार आहे,'' असे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. 

भवानीनगर : ""इंदापूरला येणाऱ्या उन्हाळ्यात ऐन गरजेच्या वेळी नीरा देवघर धरणाचे पाणी मिळणार नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे खडकवासला प्रकल्पातूनही चार टीएमसी पाणी गेल्या काही वर्षांपासून मिळत नाही. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी कोर्टकचेऱ्या, याचिकांपासून ते आंदोलनापर्यंत भूमिका घ्यावी लागणार आहे. तालुक्‍यातील 11 टीएमसी पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवणार आहे,'' असे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. 

इंदापूर तालुक्‍यातील कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्‍यातील गावभेट दौरा सुरू केला आहे. आज (ता. 2) सकाळपासून इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात त्यांनी गावभेट दौऱ्यास सुरवात केली. इंदापूरचा पश्‍चिम भाग हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे, पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसचे वर्चस्व आहे, मात्र स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने या भागात पाटील यांच्या दौऱ्यास कसा प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता होती. मात्र या दौऱ्यात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करीत पाटील यांना चांगला प्रतिसाद दिला. या दौऱ्यात सपकळवाडी येथे पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव, बापूराव सपकळ, राजेंद्र गायकवाड, सपकळवाडीचे माजी सरपंच शिवाजी सपकळ, दत्तात्रेय सपकळ आदी उपस्थित होते.या वेळी करणसिंह घोलप व बी. के. सपकळ यांनी मनोगत व्यक्त केले. 

राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी आहे, लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना याही भागाने मोठे मताधिक्‍य दिले. त्याचा विचार करता आघाडीचा धर्म मित्र पक्ष पाळेल, अशी अपेक्षा आहे. 
- हर्षवर्धन पाटील, 
माजी सहकारमंत्री 

भाऊ, तुम्ही म्हणाल ती पूर्वदिशा' 
 
मित्रपक्ष आघाडी धर्म पाळेल अशी अपेक्षा,' असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांनी "तुम्ही म्हणाल अन्‌ ठरवाल ती पूर्वदिशा,' असे म्हणत प्रतिसाद दिला आहे. इंदापूर तालुक्‍यातील विधानसभेच्या तयारीसाठी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातून हर्षवर्धन पाटील जो निर्णय घेतील, त्यास संमती दिली. 

हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुक्‍यातील गावभेट दौऱ्याची सपकळवाडी, तावशीतून सुरवात झाली. तावशीत गावातील तरुणांसह ज्येष्ठांनी मोठी गर्दी केल्याने पाटीलही खूश होते. पाटील यांच्यासमोर भाषण करताना सपकळवाडीत ज्येष्ठ नेते बी. के. सपकळ यांनी अप्रत्यक्षरीत्या राज्यभरात जी सध्याची राजकीय अस्थिरता आहे, त्याचा धागा पकडला आणि ते म्हणाले, ""आता काय होईल ते परमेश्‍वरालाच माहीत.'' त्यांनी हे विधान केले, त्या वेळी हर्षवर्धन पाटील हे सपकळवाडीत लोकसभेचे मतदान बूथनिहाय कसे झाले याची आकडेवारी घेत होते, ते एकदम अवाक झाले. त्यांनी सपकळ यांच्याकडे पाहत परमेश्‍वराला माहिती म्हणजे काय, असा सवाल केला आणि त्यांच्यासह उपस्थितांपैकी अनेकांना हसू आवरले नाही. अर्थात, राज्यातील आमदारांच्या पळवापळवीचा मुद्दा स्थानिक पातळीवरही आघाडीच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत असल्याचे हे चित्र अगदीच अधोरेखित झाले. 
 
12 ऑगस्टला मेळावा पुढे ढकलला? 
हर्षवर्धन पाटील यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे कॉंग्रेसचा गावभेट दौरा संपवून 12 ऑगस्ट रोजी मोठा मेळावा घेऊन त्यामध्ये भूमिका जाहीर करण्याचे ठरवले होते. आघाडीतील जागावाटपाचा निर्णय त्या दिवसापर्यंत होण्याची शक्‍यता नसल्याने त्यांनी 12 ऑगस्टचा मुहूर्त पुढे ढकलल्याची चर्चा येथे होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshvardhan Patil to contest the elections for Indapur water