esakal | माजी मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राज्यमंत्री भरणे यांच्यावर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

माजी मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राज्यमंत्री भरणे यांच्यावर निशाणा

वैद्यकीय सुविधा, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, औषधांचा अभाव यामुळे इंदापूर हॉटस्पॉट बनत असून, कोरोना रुग्ण राम भरोसे आहेत. यास लोकप्रतिनिधींचे चुकीचे नियोजन, निष्क्रियता कारणीभूत आहे.

माजी मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राज्यमंत्री भरणे यांच्यावर निशाणा

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : कोरोना या जागतिक महामारीचा आपल्या देशाचा मृत्यू दर २.५, राज्याचा ३, पुणे जिल्ह्याचा ३.५० तर इंदापुरचा मृत्युदर मात्र सर्वाधिक म्हणजे ४ टक्के आहे. वैद्यकीय सुविधा, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, औषधांचा अभाव यामुळे इंदापूर हॉटस्पॉट बनत असून, कोरोना रुग्ण राम भरोसे आहेत. यास लोकप्रतिनिधींचे चुकीचे नियोजन, निष्क्रियता कारणीभूत असून आणखी किती लोकांचे जीव गेल्यावर तुम्ही जागे होणार असा सवाल माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना केला.

पाटील पुढे म्हणाले, १३ सप्टेंबर अखेर तालुक्यात १७०८ कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली असून १२०२ रुग्ण ग्रामीण तर ५०६ शहरी रुग्ण आहेत. इंदापूर शासकीय वसतिगृहात २४२, उपजिल्हा रुग्णालयात ३५ तर खाजगी रुग्णालयात २७५ रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोना समूह संसर्गाचा दुसरा टप्पा असून आपली आरोग्य व्यवस्था तुटपुंजी आहे. बारामतीत १००, अकलूज मध्ये ७५, दौंड एसआरपी मध्ये १०० ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर सुविधा आहे. इंदापुरात मात्र हाताच्या बोटा वर मोजता येईल एवढे
व्हेंटिलेटर सुविधा आहे. अत्यंत वाईट अवस्था इंदापूर, निमगाव केतकी व भिगवण कोविड केअर सेंटरमधील असून भाऊ आम्हाला वाचवा असे फोन येत आहेत. तालुक्याचे प्रमुख म्हणून तुम्ही त्यास जबाबदार आहात.

तुम्ही वस्तुस्थिती जाणून न घेता पतंग उडविणे, सुरफाट्या खेळणे, सायकल चालविणे यामध्ये दंग आहात. मात्र आम्ही राजकारण न आणता विविध समस्येकडे लक्ष वेधले आम्ही त्यांना घरी बसवले आहे असे म्हणत तुम्ही सुविधा सुद्धा उपलब्ध करून देत नाही ही शोकांतिका आहे. हे सदृढ लोकशाहीचे लक्षण नसून लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री सहायतानिधीस ६०० कोटी रुपये जमा झाले असून त्यापैकी ४५ कोटी रुपये फक्त खर्च झाले आहेत. राज्यात २८८ मतदारसंघ असून ३३५ तालुके आहेत. त्यापैकी 5 कोटी रुपये मिळाल्यास तालुक्यात त्यातून सुसज्ज कोविड केअर सेंटर उभे राहून अनेकांना जीवदान मिळू शकते. सध्या सुरू असलेले लॉकडाऊन हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. तालुक्याचा कोरोना मृत्युदर कमी होण्यासाठी जबाबदार विरोधक म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालक मंत्री अजित पवार यांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी पत्र देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

loading image