हाथरस घटनेचे पुण्यात पडसाद; योगींच्या राजीनाम्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणाचे पुण्यात पडसाद उमटले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (रिपाइ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

पुणे -  उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणाचे पुण्यात पडसाद उमटले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (रिपाइ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली तर, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवदेन देत दोषींवर कारवाईची मागणी केली. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा व उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणीही केली.

हाथरस येथे दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून जीभ कापण्यात आली, अमानुष मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. या गुन्ह्याचा सीबीआय कडे वर्ग करून तो फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी रिपाइतर्फे करण्यात आली. रिपाइचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक शिरोळे, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, बसवराज गायकवाड, शशिकला वाघमारे, नीलेश आल्हाट, श्‍याम सदाफुले, किरण भालेराव आदी यात सहभागी झाले होते. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक या घटनेवर बैठक घेण्यात आली.

हे वाचा - पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचा मार्ग सुकर; वेळापत्रक जाहीर करण्यास सुरवात

घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले. मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष शिलार रतनगिरी, राजेंद्र शिरसाट, विठ्ठल गायकवाड, नगरसेवक अविनाश बागवे, महिला अध्यक्ष सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विशाल मलके आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागानेही या घटनेचा निषेध करत योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीचे निवदेन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. विभागाचे प्रमुख माजी आमदार जयदेव गायकवाड, नरेश जाधव, शैलेंद्र जाधव, मयूर गायकवाड, तुकाराम शिंदे, महेंद्र लालबिगे आदी यावेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras rape protest in pune RPI congress and ncp