निगडीतील टिळक चौक फेरीवाल्यांच्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

पिंपरी - निगडीतील टिळक चौक हा पूर्णपणे फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकला आहे. तसेच रिक्षा चालकांनी पदपथ आणि रस्त्यावरही ठाण मांडल्याने पादचाऱ्याला वालीच उरला नाही. विशेष म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर असलेले महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

पिंपरी - निगडीतील टिळक चौक हा पूर्णपणे फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकला आहे. तसेच रिक्षा चालकांनी पदपथ आणि रस्त्यावरही ठाण मांडल्याने पादचाऱ्याला वालीच उरला नाही. विशेष म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर असलेले महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

निगडीतील वाहतूक कोंडी दूर व्हावी, यासाठी कै. मधुकर पवळे उड्डाण पूल उभारला. मात्र, या चौकात चारही बाजूंनी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. येथील बस थांब्यापासून हे अतिक्रमण सुरू झाले असून, त्रिवेणीनगरकडे जाणाऱ्या मार्गावरही ते कायम आहे. येथे फेरीवाल्यांना सक्‍त मनाई असल्याचा फलक महापालिकेने लावलेला असतानाही या फलकाखालीच त्यांनी आपली दुकाने मांडली आहेत.निगडीतील ज्या पुतळ्यामुळे टिळक चौकाला नाव मिळाले तो परिसरही अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडला आहे. येथे पार्क केलेल्या वाहनांमुळे भक्‍ती-शक्‍ती चौकाकडे जाण्यासाठी अडचण होते.

महापालिकेकडून हप्तेखोरी

येथील फेरीवाल्यांकडून महापालिका ‘सुरक्षा’ म्हणून दरमहा हजारो रुपयांचा हप्ता घेत असल्याचे येथील काही दुकानदार नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. महापालिका कारवाई करणार असेल, तर एक दिवस अगोदरच त्यांना दुकाने न लावण्याबाबत सूचना दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सूचना देऊनही दुकान लावलेच तर त्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो.

पदपथ, रस्त्यावरही पार्किंग

आकुर्डीकडून आलेल्या मार्गावर तसेच त्रिवेणीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर पदपथ आणि रस्त्यावरही रिक्षा पार्क केल्या जातात. त्रिवेणीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर बसथांबा असून बहुतांशवेळा येथे बस उभ्या असतात.  याशिवाय अवैध वाहतूक करणारी वाहने, फेरीवाले यांच्यामुळे जेमतेम एकच वाहन रस्त्यावरून जाऊ शकते. टिळक चौकातही बसथांबा आणि सिग्नलला प्रवासी घेण्यासाठी शेअर रिक्षा उभ्या असतात. 

सायंकाळी फेरीवाल्यांची गर्दी

महापालिकेकडे दिवसभर कारवाई करण्यासाठी यंत्रणा असली तरी, सायंकाळी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे भेळ चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर क्षेत्रीय कार्यालयासमोरील पदपथावर फेरीवाल्यांची संख्या वाढते. खाद्यपदार्थ खाण्यासाठी आलेले ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने पार्क करतात. 

पुलाखालीही अतिक्रमण

उड्डाण पुलाखालच्या जागेत महापालिकेने अतिक्रमण केले आहे. तसेच यापूर्वी पदपथावर असलेले ट्रॅव्हल्सवाले आता पुलाखाली आले आहेत. महापालिकेने ही जागा त्यांना दिल्याचा दावा ते करतात. पुलाच्या दुसऱ्या बाजूला उद्यानासाठी असलेल्या जागेत भिकाऱ्यांनी आपले बस्तान बसविले आहे. त्यांच्यावर कारवाई करणार कोण, असा प्रश्‍न आहे. हे भिकारी पुलाखालीच नैसर्गिक विधी करीत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते.

Web Title: Hawkers encroachment in Nigadi chowk