स्मार्ट सिटीसाठी हवा हॉकर्स झोन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पिंपरी - शहरातील प्रमुख रस्ते व पदपथ पथारी, हातगाडीवाल्यांनी अडविले आहेत. फेरीवाल्यांचीही कमतरता नाही. यामुळे शहराचा बकालपणा वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी व शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनविण्यासाठी हॉकर्स झोनची निर्मिती त्वरित होणे गरजेचे आहे. 

पिंपरी - शहरातील प्रमुख रस्ते व पदपथ पथारी, हातगाडीवाल्यांनी अडविले आहेत. फेरीवाल्यांचीही कमतरता नाही. यामुळे शहराचा बकालपणा वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी व शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनविण्यासाठी हॉकर्स झोनची निर्मिती त्वरित होणे गरजेचे आहे. 

शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्‍न गेल्या दहा-बारा वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र, त्यातून अद्याप मार्ग निघालेला नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार जागा मिळेल, त्या ठिकाणी पथारी, हातगाडी लावून दुकान थाटत आहे. पिंपरी कॅम्प या मुख्य बाजारपेठेसह चिंचवड, निगडी, आकुर्डी, चिखली, भोसरी, मोशी, दापोडी, सांगवी, पिंपळे निलख, वाकड, थेरगाव, काळेवाडी आदी ठिकाणचे मुख्य रस्ते व पदपथांवर अतिक्रमणे झालेली आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्‍कील होत असून, वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडून जुजबी कारवाई केली जाते. 

शहरातील फेरीवाले, हातगाडी, पथारीवाल्यांचे महापालिकेने 2012 आणि 2014 मध्ये सर्वेक्षण केले आहे. त्यांची संख्या 10 हजार 583 आहे. त्यातील पाच हजार नऊशे जणांचे बायोमेट्रिक पूर्ण झालेले आहे. सर्वांचे बायोमेट्रिक पूर्ण करून लवकरात लवकर हॉकर्स झोन निर्माण करावा, अशी मागणी फेरीवाला संघर्ष समितीने केली आहे. शहरात साधारणतः 80 टक्के फेरीवाले, हातगाडी, पथारीवाले हे एका ठिकाणी स्थिर आहेत. 15 टक्के विक्रेते फिरते असून, पाच टक्के विक्रेते आठवडे बाजारात दुकान थाटतात, असा फेरीवाला संघर्ष समितीचा निष्कर्ष आहे. 

असे होते बायोमेट्रिक 
फेरीवाले, हातगाडी व पथारीवाल्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर प्रत्येकाचे बायोमेट्रिक केले जाते. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅंक पासबुक, दोन फोटो आवश्‍यक असतात. त्यासाठी दोनशे रुपये शुल्क आकारले जाते. बायोमेट्रिक झाल्यानंतर महापालिकेचे ओळखपत्र मिळते. 

शहरातील हातगाडी, पथारी व फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण काम थंडावले आहे. हे काम पूर्ण करावे, अपात्र ठरलेल्यांना कागदपत्रांची पूर्तता करून पात्र करावे, प्रत्येक चौकातील एक रस्ता हॉकर्स झोन करावा, चौक, प्रार्थनास्थळे, शाळांपासून शंभर मीटरपर्यंत नो-हॉकर्स झोन धोरण आम्हाला मान्य आहे. 
- काशिनाथ नखाते, अध्यक्ष, शहर फेरीवाला संघर्ष समिती 

हॉकर्स झोन तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाडी, पथारीवाल्यांवर नियमित कारवाई केली जाते. परवानाधारकांना अडथळा ठरणार नाही, अशा ठिकाणी व्यवसाय करण्यास सांगितले जाते. मात्र, परवानाधारक नसल्यास साहित्य जप्त केले जाते. 
- अण्णा बोदडे, सहायक आयुक्त, क प्रभाग 

Web Title: Hawker's Zone for Smart City