पाण्यासाठी योग्य पाठपुरावा करण्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आश्‍वासन

राजकुमार थोरात
रविवार, 25 मार्च 2018

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट देत जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना सत्य परस्थिती सांगितल्यानंतर महाजन यांनी पाणी सोडण्याची सकारात्मक भूमिका घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.

वालचंदनगर - नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी निरवांगी (ता. इंदापूर) येथे सुमारे 120 शेतकऱ्यांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला. प्रशासनातील अधिकारी शासनाची दिशाभूल करुन खोटे आकडेवाडी सांगत असल्याने पाणी सोडण्यास अचडण आली आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट देत जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना सत्य परस्थिती सांगितल्यानंतर महाजन यांनी पाणी सोडण्याची सकारात्मक भूमिका घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.

नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी निरवांगी येथे 22 मार्च पासुन इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणास सुरवात केली आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज रविवारी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शासनाकडे 155 कि.मी लांबीमध्ये नदी कोरडी असून नदीमध्ये 4 टीएमसी पाणी सोडण्याची गरज असल्याचा अहवाल पाठविल्यामुळे शासनाची पाणी सोडण्याची भूमिका नव्हती. मात्र माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी संर्पक साधला व सध्या धरणामध्ये सुमारे 63 टीएमसी पाणीसाठा असून यातील दोन ते अडीच टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. केवळ अर्धा ते पाऊण टीएमसी पाणी नीरा नदीमध्ये सोडल्यास इंदापूर, माळशिरस व फलटण तालुक्यातील 28 गावातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या, जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार असल्याचे सांगितल्यानंतर महाजन यांनी तातडीने पुणे व सोलापूर जिल्हातील जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे फोनवरुन कळविले. यावेळी पाटील यांनी सांगितले की, सोमवार (ता. 26) रोजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या माध्यमातून नीरा नदी मध्ये पाणी सोडण्यासाठी सरकारकडे मागणी करुन मुख्यमंत्रयाकडे ही पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, संचालक रणजित पाटील, जयकुमार कारंडे उपस्थित होते. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना शिवसेनेचे अॅड. राजेंद्र काळे, संजय काळे, योगेश कणसे, अॅड. नितीन कदम, भाजपचे बाबासाहेब चवरे, नानासाहेब शेंडे, युवराज म्हस्के, माऊली चवरे, रमेश खारतोडे, सतिश खराडे यांनी भेटी दिल्या.

अधिक्षक अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी...
पाटबंधारे विभागाचे अधिकारी शासनाला खोटी माहिती देवून दिशाभूल करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्‍न ही ऐकून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याने जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे केली आहे.दरम्यान माने यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची काळजी घेवून त्यांच्या प्रकृतीकडे बारीक लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती खालवतेय...
आज रविवार (ता. 25) रोजी उपोषणाचा चौथा दिवस होता. 16 शेतकरी उपोषणला बसले असून यातील तीन शेतकऱ्यांची प्रकृती खालावल्याने अजिनाथ कांबळे (वय 79) व शंकर होळ (वय 72)  या दोन शेतकऱ्यांना इंदापूर उपजिल्हारुग्णालय व किरण बोरा (वय 55) या शेतकऱ्याला बारामतीमध्ये दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले अाहे.

महिलांचा रास्तारोको आंदोलन...
सोमवार (ता. 26) रोजी नदीकाठच्या गावातील महिला निरवांगी (ता. इंदापूर) येथे नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी रास्तारोको आंदोलन करुन शासनाचा व प्रशासनाचा निषेध करणार आहेत.

Web Title: he assurance of former minister Harshavardhan Patil for proper followup for water