#makepunesafe त्या अपघाताने मी पुरता कोलमडलोय.....

pune-hoaurdings-accident.jpg
pune-hoaurdings-accident.jpg

पौडरस्ता (पुणे) : रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील होर्डींग्ज कोसळल्याने माझ्या बरोबर रिक्षाचेही अतीव नुकसान झाले. त्या अपघाताने मी पुरता कोलमडलोय. मला सावरण्याचीही संधी मिळत नाही मी काय करु असे बोलत यशवंत रामा खोबरे भावविवश झाले.

5 ऑक्टोबरला पुण्यात झालेल्या अनाधिकृत होर्डींग्ज दुर्घटनेत चार जण दगावले. रिक्षावर होर्डींग्ज कोसळून खोबरेंच्या डोक्याला मार लागला. माणेच्या मणक्याला दुखापत झाली. अपघातातील जखमींना एक लाख रुपये देण्याचे रेल्वेने कबूल केले. त्यापैकी चाळीस हजाराचा चेक व दहा हजार रुपये रोख असे खोबरेंच्या कुटूंबियांना मिळाले. परंतु अजून पन्नास हजार मिळणे बाकी आहे. अपघातात नुकसान झाल्याने खोबरेंची रिक्षा बंद आहे. उपचार चालू असल्याने खोबरे आता दुसरे काम करु शकत नाहीत. त्यांच्या घरखर्चाचा सारा बोजा घरकाम करणा-या त्यांच्या पत्नीवर आला आहे. 

पौडरस्त्यावरील लोकमान्य वसाहतीत आई, दोन मुले, पत्नीसह खोबरे राहतात. रिक्षा चालवून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर घरचे भागत नसल्याने पत्नी घरकाम करुन संसाराच्या गाड्याला वेग देत होती. त्यातच हा अपघात झाल्याने खोबरेंच्या कुटूंबावर फार मोठा ताण आला आहे. 

खोबरे म्हणाले की, ''आयडीबीआय बँकेचे कर्ज काढून मी रिक्षा घेतली. त्याचे एक लाख वीस हजार रुपये भरायचे आहेत. अपघातात या रिक्षाचे तीस हजाराचे नुकसान झाले आहे. माझा डावा हात उचलत नाही. मानेला त्रास होतोय. रिक्षाचे कर्ज फेडू कुठून आणि दुरुस्तीला पैसे आणू कोठून. मला अधू झाल्या सारखे वाटतेय.''

जनाबाई खोबरे (पत्नी) म्हणाल्या की, ''दोन वर्षापूर्वी चांदणी चौकात महापालिकेच्या कचरा गाडीने यांच्या रिक्षाला उडवले होते. तेव्हा सुध्दा नशिबामुळे ते वाचले. कचरा ठेकेदाराने त्यावेळी दहा हजार रुपये देवून आमची बोळवण केली. पण आमचा खर्च मात्र लाखावर गेला. आमची ती रिक्षा भंगारात चार हजाराला विकावी लागली. सगळेच आम्हाला मारायला निघालेत. कसं जगावं आम्ही.''

अन्नपुर्णा खोबरे (आई) म्हणाल्या की, ''माझ्या मुलाला दोन पोरं आहेत. त्यांच्या शाळेचा खर्च, घरचा खर्च, आता या अपघातामुळे आलेल्या आजारपणाचा खर्च आणि बँकेच्या कर्जाचा खर्च असा सगळा खर्चच खर्च आमच्या समोर उभा आहे. पण कमाई म्हणाल तर काहीच नाही. माझ्या पोराचा दोष तरी काय होता. त्याला न्याय मिळलं का?''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com