प्रेयसीसाठी पत्नीसह चिमुरड्याची गळा आवळून हत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

दत्ताचे आणखी एक प्रेम प्रकरण उघड 
गुन्ह्याचा तपास करताना दत्ताने आणखी एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दोन महिन्यांपूर्वीच तिचा साखरपुडा मोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा मोबाईल तपासला. तेव्हा अनेक तरुण मुली त्याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

हिंजवडी : प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पत्नीसह आठ महिन्यांच्या चिमुरड्याची पतीने सुपारी देऊन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हिंजवडी परिसरातील नेरे-जांबे रस्त्यालगतच्या मोकळ्या मैदानात घडली. शनिवारी (ता. 9) रात्री दहाच्या सुमारास या मायलेकरांची गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले. 

अश्‍विनी भोंडवे (वय 27) व अनुज भोंडवे (वय 8 महिने), अशी मायलेकरांची नावे आहेत. अश्‍विनीचा पती दत्ता वसंत भोंडवे (वय 30 रा. दारूंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) याच्यासह त्याची प्रेयसी सोनाली बाळासाहेब जावळे (वय 24), प्रशांत जगन भोर (वय 25) व पवन नारायण जाधव यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. 

परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी या दुहेरी हत्याकांडाची पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, की शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हिंजवडी पोलिसांना खबर मिळाली, की नेरे-जांबेच्या परिसरात अज्ञात लुटारूंनी मायलेकरांचा गळा आवळून खून करून लूटमार केली. जखमी झालेला अश्विनीचा पती दत्ता भोंडवे याला बिर्ला रुग्णालयात पोचण्यास अडीच-तीन तास लागले. त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. दत्ताची उलट तपासणी पोलिसांनी केली. सुरवातीला दत्ताने अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला करून पत्नी व मुलाची हत्या केल्याचा, तसेच सोने, रोख रक्कम लुटल्याचा बनाव रचला. हिंजवडी ठाण्यात तशी फिर्यादही दिली. पोलिसांनी तपास सुरू करत पथकेही रवाना केली. मात्र, दत्ता देत असलेली माहिती संशयास्पद वाटू लागल्याने अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 

दत्ताचा अश्‍विनीशी 2014 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना अनुष्का (वय 3) व अनुज (वय आठ महिने), अशी दोन मुले झाली. आठ दिवसांपूर्वीच दोन्ही मुलांना घेऊन अश्‍विनी तिच्या माहेरी डांगे चौकात गेली होती. शनिवारी (ता. 9) अश्‍विनीच्या लहान बहिणीच्या घरी धोंडे जेवण असल्याने तिचे आई-वडील व नातेवाइक निघोजेला गेले होते. रात्री आठच्या सुमारास दत्ता मोटारीतून अश्‍विनीला घेण्यासाठी डांगे चौकात गेला होता. जेवण उरकून दोघेही दारूंब्रेकडे जात होते. तेव्हा पुनावळे येथे दत्ताला उलट्या होऊ लागल्या. तो चूळ भरण्यासाठी गाडीतून खाली उतरला. तेव्हा प्रशांत भोर, पवन जाधव हे त्याच्या गाडीत येऊन बसले व त्यांनी अश्‍विनी व दत्ताला चाकूचा धाक दाखवून मोटार नेरे-जांबे रस्त्यावर नेण्यास भाग पाडले. तेथे दोरीने गळा आवळून अश्‍विनी, अनुजचा खून केला. 

दत्ताचे हिंजवडी आयटी पार्कमधील कंपनीत ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे कंत्राट आहे. त्यामुळे हिंजवडीतील माध्यमिक शाळेत काम करणाऱ्या सोनालीशी त्याची फेसबुकवरून ओळख झाली होती. अडीच वर्षांपासून असलेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व पत्नीचा काटा काढल्यानंतरच तुझ्याशी लग्न करता येईल, असं दत्ताने सोनालीला सांगितलं होतं. त्यानुसार दोघांनी अश्‍विनीच्या खुनाचा कट रचला व प्रशांत भोर, तसेच पवन जाधवला अश्‍विनीच्या खुनासाठी अडीच लाखांची सुपारी दिली. त्यातील 50 हजार रुपयेही त्याने दिले होते, अशी माहिती हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी दिली. हिंजवडी, वाकड व गुन्हे शाखेच्या तपास पथकांनी बारा तासांत सर्व आरोपीना गजाआड केले. पोलिस निरीक्षक (गुन्हे) आर. जी. उंडे तपास करीत आहेत. 

अन्यथा अनुष्काचाही बळी गेला असता... 
अनुष्का ही अश्‍विनीच्या आई-वडिलांसोबत मावशीच्या घरी धोंडे जेवणासाठी गेले होती. अनुष्काही गेली नसती, तर तिचाही बळी आरोपींनी घेतला असता, अशा भावना अश्‍विनीच्या भावांनी पोलिस ठाण्यात व्यक्त केल्या. सर्व आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

दत्ताचे आणखी एक प्रेम प्रकरण उघड 
गुन्ह्याचा तपास करताना दत्ताने आणखी एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दोन महिन्यांपूर्वीच तिचा साखरपुडा मोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा मोबाईल तपासला. तेव्हा अनेक तरुण मुली त्याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Web Title: he killed wife and son for girlfriend in Pune