जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची गरज

चंद्रकला ओव्हाळ
सोमवार, 30 एप्रिल 2018

तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता या उपदेशांचा प्रत्येकाने अवलंब केल्यास आयुष्यातील दुःख नष्ट होऊन जीवन सुखकर होऊ शकते. बुद्धधम्माच्या विचारधारेत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय याला महत्त्व असून सारे जग आज भयावह परिस्थितीतून जात असताना जगाला युद्धाची नाही, तर बुद्धाची गरज आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

सुखो बुद्धानमुप्पादो सुखा सद्धम्मदेसना!
सुखा संघस्स सामग्गी समग्गान तपो सुखो!!

फार पूर्वीपासून मानव युद्धनीतीत अडकून पडल्याने त्याचा समज होऊन बसला की, युद्धात आधुनिक, नवीन पद्धत आल्यास आपण सुरक्षित राहू. पण जेवढी युद्धकलेत, युद्धनीतीत प्रगती झाली, त्यापेक्षा मानव जास्त असुरक्षित झाला. माणूस माणसावर, निसर्गावर कुरघोडी करतो. त्यामुळे देश, राष्ट्र एकमेकांवर कुरघोडी करू लागले. म्हणून घातपात, अराजकता वाढली. प्रत्येक देशाला शस्त्रे अस्त्रावर अतिरिक्‍त खर्च मूलभूत गरजांपेक्षा करावा लागत असल्याने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यामुळे माणसाच्या मनात राग, द्वेष उत्पन्न होतो. 

सर्व सुखसोई माझ्याकडे असाव्यात, माझेच वर्चस्व व्हावे, या हव्यासापोटी खून, चोऱ्या, व्यभिचार अशा घटनांत वाढ होत आहे. 

भगवान गौतम बुद्धांनी सांगितले, की युद्ध हे प्रथम त्या माणसाच्या मनात तयार होते, मग ते कोणत्याही प्रकारचे युद्ध असो, एकट्याचे, सामाजिक अथवा इतर. एखाद्याला शारीरिक, मानसिक इजा करायची असेन, त्रास द्यावयाचा असेन तर प्रथम ती कृती, तो त्रास त्याचा मनाला होतो. कारण, ती कृती त्याच्या मनात होत असते. पण जर प्रत्येकाने संयम ठेवला तर नक्की चांगला मार्ग मिळतो. म्हणजे बाहेरील वातावरण निर्मळ, शांत, शुद्ध करण्यापेक्षा प्रथम अंर्तमन शांत, निर्मळ, शुद्ध करावे लागेल. जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद, वंशभेद, दहशतवाद, शोषण यामुळे जगात अराजकता फोफावली आहे. मानव पैसा, सत्ता, पद, प्रतिष्ठा, मान-सन्मान अशा लोभांमागे धावत असल्याने स्वतःला, कुटुंबाला, देशाला अन्‌ जगाला विनाशाकडे घेऊन जाणे आहे. याविरुद्ध लढण्यासाठी सर्व भेदाभेदीच्या भिंती पाडून विचाराची व्यापकता वाढविली पाहिजे. 

तथागतांचा प्रथम उपदेश पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता असून बुद्धाधम्माच्या विचारधारेत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय याला महत्त्व आहे. 

पंचशील  
१) कोणाचीही हत्या न करणे, २) चोरी न करणे, ३) व्यभिचार न करणे, ४) खोटे न बोलणे, लबाडी व चहाडी न करणे, ५) दारू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन न करणे या पाच नियमांचे पालन केल्यास मनुष्य दुःखी होणार नाही.

अष्टांगिक मार्ग  
सम्यकदृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजिविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हे अष्टांगिक मार्ग असून आधिभौतिक दुःख नष्ट करण्यासाठी या मार्गांचा अवलंब करणे गरजेचे आहे.  

पारमिता  
पारमिता म्हणजे पूर्णत्वाची अवस्था होय. शील, दान, उपेक्षा, शांती, नैष्कम्य, विर्य, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री या दहा पारमिता होत.

आर्यसत्य   
दुःख, दुःखाचे कारण, दुःखातून मुक्ती व मुक्तीचा मार्ग हे चार आर्यसत्य आहेत. 
      
तो खरा मानव
ज्याचा इंद्रियांवर ताबा आहे. सुखाच्या आहारी न जाता वायफळ बडबड न करणारा, परधनावर लक्ष न ठेवता सर्व प्राणिमात्रांना जीव लावतो, काळजी घेतो, तो खरा मानव आहे. सारे जग आज भयावह परिस्थितीतून जात असताना जगाला युद्धाची नाही, तर बुद्धाची गरज आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त महामानव तथागतांना वंदन करूयात.

Web Title: he world needs the philosophy of Buddha