गुरुजींची ‘निष्ठा’ प्रशिक्षणाशी

Headmaster
Headmaster

सोमेश्वरनगर - प्रज्ञा शोध- शिष्यवृत्तीचा अभ्यास आणि कला- क्रीडा स्पर्धा टिपेला पोचलेल्या असतानाच एससीईआरटीने गुरुजींना ‘निष्ठा’ प्रशिक्षणात अडकवून विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. प्रत्येक तालुक्‍यातील एकावेळी दीडशे शिक्षक तब्बल पाच दिवस प्रशिक्षणात अडकल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. खुद्द सरकारनेच आरटीईतील २२० दिवस अध्यापनाच्या तरतुदीला हरताळ फासला आहे.

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने चुकीचे टायमिंग साधून जिल्हा परिषद शाळांचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांवर ‘निष्ठा’ (National initiative for school Heads & Teachers Holistic Advancement) नावाचे प्रशिक्षण गुणवत्तावाढीसाठी लादले आहे. महाराष्ट्रात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) हे राबवत आहे. राज्य पातळीवर तालुक्‍यातून निवडक पाच मराठमोळ्या गुरुजींना चक्क इंग्रजीतून प्रशिक्षण देण्यात आले आणि आता हे पाच ‘मास्टर ट्रेनर’ तालुका पातळीवर मराठी, इंग्रजी, विज्ञान, गणित, समाजशास्त्र विषय शिकवत आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्‍यात सध्या एकावेळी दीडशे शिक्षकांच्या बॅच सुरू आहेत.

एका बीटमध्ये दीडशेचा आकडा गाठण्यासाठी प्रत्येक शाळेवरील निम्मे शिक्षक पाच दिवसांसाठी बोलविले जात आहेत. परिणामी प्रशिक्षणाला गेलेल्या शिक्षकांच्या तासिका बुडत आहेतच; पण शाळेतील उर्वरित गुरुजींचा चार- चार वर्ग सांभाळण्यातच वेळ जात आहे. प्रशिक्षणावरचे शिक्षक परतले, की उर्वरित शिक्षक प्रशिक्षणासाठी जाणार.

महिनाभर हा खेळ चालणार आहे. यामुळे शाळेचे किमान दहा दिवस ते एक महिन्याचे वेळापत्रक कोलमडून शिक्षण हक्क कायद्याचा भंग होणार आहे. मास्टर ट्रेनरचा वर्ग तर खात्रीने महिनाभर बुडणार आहे.या अवेळी प्रशिक्षणामुळे शिक्षकच काय आम्हीदेखील अचंबित आहोत. ‘वरून आले’ असे बोट दाखवून नाईलाजास्तव सक्ती करावी लागत आहे, अशा भावना काही अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या.

‘‘सध्या प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय या महत्त्वपूर्ण परीक्षांचा अंतिम टप्पा आहे. स्नेहसंमेलन, आनंद बाजार, २६ जानेवारी यांची धामधूम सुरू आहे. ‘इंग्रजी पेटी’चे प्रशिक्षणही काही ठिकाणी सुरू आहे. अशात ‘निष्ठा’ प्रशिक्षणाने कोणती गुणवत्ता वाढणार? एप्रिल- मेमध्ये घ्यायचे ते घ्या,’’ अशी प्रतिक्रिया शाळा समितीचे माजी अध्यक्ष मोहन जगताप, शिक्षणप्रेमी सदस्य हेमंत गायकवाड यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com