आरोग्य खाते घेतेय मातृत्वाची काळजी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

महापालिकेने सोय केल्याने लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सारे शाळांच्या इमारतीत राहू लागले. पोटातल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी येरवड्यातल्या शांतिनगरमधल्या अंबिका पाटोळे या नऊ महिन्यांच्या गर्भवतीनेही तात्पुरतं घर सोडलं.

पुणे - घरादारात पुराचं पाणी शिरलं. डोळ्यांदेखत संसाराला पाण्याने वेढलं. जिवाचा घोर वाढला आणि तब्बल पाच हजार जण सुरक्षित स्थळी पोचले. महापालिकेने सोय केल्याने लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सारे शाळांच्या इमारतीत राहू लागले. पोटातल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी येरवड्यातल्या शांतिनगरमधल्या अंबिका पाटोळे या नऊ महिन्यांच्या गर्भवतीनेही तात्पुरतं घर सोडलं.

अंबिका यांच्यासह ८३ गर्भवतींचं मातृत्व सांभाळण्यासोबतच ते सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या आरोग्य खात्याची यंत्रणा सतर्कता दाखवत आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा )अशा महिलांसाठी खास स्त्रीरोगतज्ज्ञ, रुग्णवाहिका आणि औषधोपचार पुरविण्यावर महापालिकेचा भर आहे.   या महिलांसह गेल्या चार दिवसांत ज्येष्ठ नागरिक, विशेषतः महिला आणि लहान मुलं अशा १ हजार ४०५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे, असे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.  ते म्हणाले, ‘‘शिबिरात गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. सर्वच ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञ पोचून तपासणी करीत आहेत. त्यांचे रक्त, शुगर आणि थायराईड आदी तपासले जात आहेत. पुढील काही दिवस तज्ज्ञांची टीम शाळांमध्ये राहणार आहे.’’   

सर्व सुविधा उपलब्ध
शहरात अतिवृष्टी होण्याच्या शक्‍यतेने काही भागांतील रहिवाशांना मंगळवारी रात्रीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पाऊस वाढण्याची चिन्हे दिसताच गरजेनुसार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची सोय करण्यात आली होती. मात्र, पाऊस नसल्याने कोणालाही हलविण्यात आले नाही. सध्या ज्या ठिकाणी स्थलांतरित नागरिक राहात आहेत, त्यांना सर्वच प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

माझी आरोग्य तपासणी रोज केली जात आहे. डॉक्‍टारांकडून वेळोवेळी चांगले उपचार मिळत आहेत. माझ्या आहाराकडे लक्ष दिले जात आहे. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्याची सोयही करण्यात आली आहे.
- अंबिका पाटोळे, येरवडा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Department Taking Care