मोबाईलवरून आरोग्य सेवेची माहिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

राज्यात अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्यकार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, आरोग्य सभापती प्रवीण माने यांच्या सहकार्याने ऍपमध्ये नवीन बाबींचा समावेश करून तालुकास्तरावरील सर्व सरकारी रुग्णालयात या ऍपचा वापर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी.

भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ऍप विकसित

नसरापूर: भोर तालुक्‍यातील भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णांच्या सेवेसाठी डिजिटल ऍप विकसित केले आहे. या ऍपला गुगलने 5 स्टार रेंटिंग दिले आहे. सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता, प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी यानुसार पुणे जिल्हा परिषदअंतर्गत भोंगवली (ता. भोर) प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल राठोड यांनी हे आरोग्यविषयक ऍप विकसित केले आहे. यासाठी माहिती संकलन व निर्मितीसाठीच कनिष्ठ सहायक सुशांत मोहीते, आरोग्य सहायक सुरेश निगडे यांनी महत्त्वपूर्ण भुमिका बजावली आहे.

या ऍपमध्ये आरोग्याच्या ग्रामीण योजना त्यासाठी लागणारी कागदपत्रे, प्रयोगशाळेचे अहवाल व इतर माहिती उपलब्ध होते आहे. यामुळे प्राथमिक केंद्रात तपासणी केल्यावर रुग्णाने ऍपमध्ये आपला बारकोड टाकल्यावर सर्व तपासणीचे रिपोर्ट घरबसल्या मिळणार आहेत. याबरोबरच ऍपमध्ये वैद्यकीय केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांची नावे संपर्क क्रमांक, विविध समित्या व त्यावरील पदाधिकारी यांची माहितीदेखील उपलब्ध आहे. केंद्रातील 16 गावांमधील18 हजार 465 नागरिकांना या ऍपचा लाभ होणार आहे. या ऍपमुळे आरोग्य योजना घराघरात पोहचल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सुविधा घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

सुशांत मोहीते यांनी सांगितले, की हे ऍप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन पी एच सी भोंगवली टाईप करून ऍप डाऊनलोड करता येणार आहे. सर्व स्मार्टफोनधारक हे ऍप डाऊनलोड करू शकतात.

Web Title: Health service information from mobile