#HealthCare धर्मादाय रुग्णालयांना गरिबांची अॅलर्जी

अनिल सावळे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे - गरीब रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दराने उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांच्या विश्‍वस्तांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला; तसेच धर्मादाय आयुक्‍त कार्यालयांकडून गरीब रुग्णांच्या मदतीसाठी प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, काही धर्मादाय रुग्णालयांच्या विश्‍वस्त, डॉक्‍टरांनी गरीब रुग्णांच्या उपचाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र पुण्यासह अन्य शहरांमध्ये दिसून येत आहे. 

पुणे - गरीब रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दराने उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांच्या विश्‍वस्तांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला; तसेच धर्मादाय आयुक्‍त कार्यालयांकडून गरीब रुग्णांच्या मदतीसाठी प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, काही धर्मादाय रुग्णालयांच्या विश्‍वस्त, डॉक्‍टरांनी गरीब रुग्णांच्या उपचाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र पुण्यासह अन्य शहरांमध्ये दिसून येत आहे. 

धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी प्रत्येकी १० टक्के खाटा राखून ठेवणे; तसेच उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम गरीब रुग्णांच्या उपचारासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. काही धर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांवर दोन टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रक्‍कम खर्चही केली आहे; परंतु ही संख्या मोजकीच आहे. बऱ्याच धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना प्रवेश नाकारला जात आहे. त्यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले जाते; तसेच महागडी औषधे बाहेरून आणण्यास सांगितले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

तीन महिन्यांची शिक्षा
धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी खाटा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे; परंतु गरिबांना त्याचा फायदा दिला जात नाही. अशा रुग्णालयांच्या विश्‍वस्तांना तीन महिने शिक्षा आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रस्तावित आहे.

फौजदारी कारवाई करण्याची शिफारस
धर्मादाय रुग्णालय समितीने पाहणीत दोषी आढळलेल्या मुंबईतील एका रुग्णालयाचा अपवाद वगळता विश्‍वस्तांवर फौजदारी कारवाई केलेली नाही. मुंबईतील तीन ते चार रुग्णालयांवर कारवाईची शिफारस केली आहे; तर पुण्यातील तीन धर्मादाय रुग्णालयांच्या सोयी-सुविधा काढून घेतल्या आहेत.

डॉक्‍टरांकडून अवमान
धर्मादाय रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाइकांना डॉक्‍टरांकडून अपमानित करण्यात येत असल्याच्या घटना राज्यात घडत आहेत.  

पैसे असतील, तरच उपचार
धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांकडे पैसे असतील, तरच चांगले उपचार केले जातात. गरीब रुग्ण योजनेअंतर्गत उपचार करीत असल्याचे समजताच, त्या रुग्णाकडे दुर्लक्ष केले जाते; तसेच गंभीर आणि अत्यवस्थ रुग्णांना साध्या, गलिच्छ वॉर्डमध्ये ठेवले जात असल्याचे समोर आले आहे. 

धर्मादाय रुग्णालयांची संख्या
राज्य - ४३०
पुणे ५७

अशी आहे योजना
निर्धन रुग्णांसाठी : वार्षिक उत्पन्न ८५ हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास मोफत उपचार
दुर्बल घटकांसाठी : वार्षिक उत्पन्न ८५ हजार ते १.६० लाख रुपयांपर्यंत असल्यास ५० टक्‍के सवलत
(दोन्ही घटकांसाठी उपचार खर्चाची मर्यादा नाही)

रुग्णालयाकडून वाईट अनुभव मिळाला. निधी उपलब्ध नाही, असे सांगितले जाते. धर्मादाय रुग्णालयांची प्रत्यक्ष पाहणी करून गरीब रुग्णांवर उपचारास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करावी.  
- रुग्णाचा नातेवाईक, पुणे

गरीब रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांबाबत तक्रार करावी. धर्मादाय रुग्णालयांच्या दोषी विश्‍वस्तांवर कारवाई करण्यात येईल. 
- शिवकुमार डिगे, धर्मादाय आयुक्‍त 

Web Title: #HealthCare poor patient hospital issue doctor