हृदयाचाही बाजार!

योगिराज प्रभुणे
शनिवार, 29 एप्रिल 2017

पुणे - हृदयाची अँजिओप्लास्टी करताना वापरण्यात येणाऱ्या स्टेंटची किंमत दीड लाख रुपये असताना रुग्णालय त्या उपचाराचे एकूण बिल आकारत होते पावणेदोन लाख रुपये... आता स्टेंटची किंमत अवघ्या तीस हजारांपर्यंत कमी झाली असताना तेच रुग्णालय बिल देते एक लाख ६५ हजार रुपये... याचाच अर्थ स्टेंटची कमी झालेली किंमत रुग्णालये रुग्णांपर्यंत न पोचवता आपल्या खिशात घालत आहेत. ‘सकाळ’ने निवडक रुग्णालयांची पाहणी केली तसेच त्यांच्याकडून अँजिओप्लास्टीचे दरपत्रक मिळवले. त्यातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पुणे - हृदयाची अँजिओप्लास्टी करताना वापरण्यात येणाऱ्या स्टेंटची किंमत दीड लाख रुपये असताना रुग्णालय त्या उपचाराचे एकूण बिल आकारत होते पावणेदोन लाख रुपये... आता स्टेंटची किंमत अवघ्या तीस हजारांपर्यंत कमी झाली असताना तेच रुग्णालय बिल देते एक लाख ६५ हजार रुपये... याचाच अर्थ स्टेंटची कमी झालेली किंमत रुग्णालये रुग्णांपर्यंत न पोचवता आपल्या खिशात घालत आहेत. ‘सकाळ’ने निवडक रुग्णालयांची पाहणी केली तसेच त्यांच्याकडून अँजिओप्लास्टीचे दरपत्रक मिळवले. त्यातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

हृदयावरील उपचाराचे बिल हे प्रत्येक रुग्णाच्या स्थितीनुसार बदलते. एकंदर रक्तवाहिन्यांमध्ये किती टक्के अडथळा (ब्लॉक) आहे, यावर स्टेंटची संख्या ठरते तसेच त्याला मधुमेह आहे का नाही आणि इतर गुंतागुंत किती आहे, यावरून उपचाराचा खर्च ठरतो. त्यामुळे स्टेंट बसविण्याची गरज असलेल्या रुग्णांची माहिती ‘सकाळ’ने घेतली. स्टेंटची किंमत कमी होण्यापूर्वी देण्यात येणारे दरपत्रक आणि ती किंमत कमी झाल्यावर देण्यात येणारे दरपत्रक यांची तुलना केली असता अँजिओप्लास्टीचे पॅकेज जवळपास जसेच्या तसेच राहिल्याचे दिसून आले.

स्टेंटची किंमत कमी होऊनही ‘अँजिओप्लास्टी’चा खर्च तेवढाच!

खर्च तेवढाच! 
एक स्टेंट बसविण्याची गरज असलेल्या रुग्णाला पूर्वी पावणेदोन लाख रुपये खर्च येत होता. तो आता केवळ दहा हजारांनीच कमी झाला असून, त्याचे बिल एक लाख ६५ हजार रुपये करण्यात येत आहे. स्टेंटच्या नफेखोरीबद्दल ‘सकाळ’मध्ये वृत्तमालिका प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर काही काळाने केंद्र सरकारच्या ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ॲथॉरिटी’ने स्टेंटची किंमत दीड लाखावरून ३० हजार रुपयांपर्यंत कमी केली. 

अँजिओप्लास्टी प्रमुख खर्च 
हृदयरोग तज्ज्ञांचे शुल्क, नर्सिंग, अँजिओप्लास्टीसाठी वापरलेल्या साहित्याचा, स्टेंट आणि औषधे यांचा एकूण खर्चात समावेश असतो. रुग्णालयांकडून पूर्वीच्या तुलनेत आता हा खर्चच फुगविला असल्याचे दिसून येते. स्टेंटच्या किमती कमी झाल्याने रुग्णालयांनी या खर्चाची रक्कम वाढविली आहे. बिलामध्ये स्टेंटची स्वतंत्र किंमत नमूद करावी, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. बिलात त्याचा उल्लेख केला जात असला तरीही त्यातील इतर घटकांची फोड यात दिलेली नाही. त्यामुळे सामान्यतः अँजिओप्लास्टीचा पावणेदोन लाख रुपयापर्यंत येणारा खर्च आता एक लाख ६५ हजारांपर्यंत येत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

बिलवाढीचे लंगडे समर्थन 
रुग्णालयांकडून मात्र साहित्याच्या किमतीत वाढ करण्यात आल्याचे समर्थन करण्यात येते. अँजिओप्लास्टीसाठी गाइड, कॅथलेटर, वायर आणि बलून हे साहित्य वापरले जाते. आतापर्यंत हे साहित्य निर्जंतुक करून चार ते पाच रुग्णांवर हे वापरले जात होते; पण प्रत्येक रुग्णासाठी नवीन साहित्य वापरण्याचा आदेश सरकारने दिला आहे. या एका साहित्याची किंमत दहा हजार रुपयांपर्यंत असते. त्यामुळे अँजिओप्लास्टीच्या पॅकेजच्या किमतीत फारसा फरक पडला नाही, असा दावा काही रुग्णालय व्यवस्थापकांनी ‘सकाळ’शी बोलताना केला. मात्र, सकाळने या साहित्याच्या किमती तपासल्या असता ते केवळ एकाच रुग्णासाठी वापरले तरी जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयेच जादा लागणार असल्याचे स्पष्ट झाले. याचाच अर्थ हा खर्च वाढूनही शस्त्रक्रियेचा खर्च जास्तीत जास्त एक लाखापर्यंतच होऊ शकतो. मात्र, प्रत्यक्षात बिल एक लाख ६५ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. 

स्टेंटच्या किमती कमी केल्या असल्यास तरीही अँजिओप्लास्टीसाठी आवश्‍यक साहित्य प्रत्येक रुग्णासाठी नवीन वापरण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे त्याचा खर्च वाढला आहे. तसेच, स्टेंटच्या किमती नियंत्रित केल्याने चांगल्या दर्जाचे स्टेंट देशातील बाजारपेठेत येणार नाही.
- डॉ. पी. के. ग्रॅंट, रुबी हॉल क्‍लिनिक

स्टेंटच्या कमी झालेल्या किमतीने थेट रुग्णाला फायदा देण्यात आला आहे. स्टेंटच्या प्रमाणात अँजिओप्लास्टीचे पॅकेज कमी केले आहे.
- डॉ. शिरीष साठे, हृदयरोगतज्ज्ञ, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय 

‘अँजिओप्लास्टी’त वाढ 
शहरातील चाळिशीच्या आतील रुग्णांवर अँजिओप्लास्टी करण्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षांमध्ये पाचवरून दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. शहरातील प्रमुख रुग्णालयांमधून गेल्या वर्षभरात साडेचार हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी झाल्या आहेत.

Web Title: heart market