हृदयावरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

रक्ताभिसरण प्रक्रिया ४० मिनिटे रोखून ठेवत बेन्टॉल ही हृदयाशी संबंधित आव्हानात्मक शस्त्रक्रिया पुण्यात झाली.

पुणे -  रक्ताभिसरण प्रक्रिया ४० मिनिटे रोखून ठेवत बेन्टॉल ही हृदयाशी संबंधित आव्हानात्मक शस्त्रक्रिया पुण्यात झाली. या शस्त्रक्रियेतील यशामुळे रुग्णाला जीवनदान देण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे.

ज्ञानेश्वर सदाफुले (४६ वर्षे) यांच्या छातीत दुखू लागलं. त्यातच त्यांची पाठदेखील दुखू लागली. या बद्दल माहिती देताना जहांगीर रुग्णालयातील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. राकेश कौशिक म्हणाले, ‘‘रुग्णाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील दोषाचा परिणाम हृदयाच्या झडपांवर होत होता. रुग्णाला जन्मतः ‘बायकसपीड एरोटिक व्हॉल्व्ह’चा (बीएव्ही) आजारामुळे झडपेतून रक्त बाहेर येत राहाते आणि झडप आकुंचन पावत जाते. सामान्यतः निरोगी व्यक्तीला तीन झडपा (लिफलेट्‌स) असतात. परंतु, रुग्णाला केवळ दोनच होत्या. त्यातच हृदयाला जोडणाऱ्या आर्चला सूज आली होती. त्यातून रुग्णाच्या महाधमन्यांमधील रक्तवाहिन्या कमजोर होतात आणि फुगण्याचा धोका असतो.’’

अशी केली शस्त्रक्रिया
हृदय आणि त्यातील महाधमन्यांच्या रक्तवाहिन्या कोणत्याही क्षणी फुटू शकतात, असे हृदयाच्या सीटी स्कॅनमध्ये दिसले. त्यामुळे बेन्टॉल शस्त्रक्रियेत रक्तपुरवठा करणाऱ्या झडपांचे आकुंचन करण्यात आले. आर्चच्या जागी ग्राफ्ट बसविण्यात आले, असे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. दुग्गल यांनी सांगितले. डॉ. कौशिक म्हणाले, ‘‘रुग्णाच्या आर्चलाही सूज आल्याने तेही बदलावे लागणार होते. त्रिभाजित ग्राफ्ट एक एक करत तीन आर्च रक्तवाहिन्यांना जोडण्यात आला. या प्रक्रियेनंतर रुग्णाच्या शरीराचे तापमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणले. या प्रक्रियेदरम्यान ४० मिनिटे हृदयाचे कार्य थांबविले. यात ‘एऑर्टिक व्हॉल्व्ह’च्या जागेवर कृत्रिम व्हॉल्व्ह बसविला. ही शस्त्रक्रिया सुरू असताना मेंदूला आवश्‍यक रक्तपुरवठा पंपाद्वारे करण्यात  येत होता.’’ 

रुग्णाला कार्डिओपल्म्युनरी बायपास मशिनवर ठेवले होते. ‘ब्लड काउंट’ सेच प्लाझ्मा ते प्लेटलेट्‌स यावर दीर्घ काळपर्यंत लक्ष ठेवण्यात आले. कारण अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये ज्यात रुग्णाचे हृदय धडधडणे थांबते, त्यात रुग्णाच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका असतो.
डॉ. सी. एस. कुलकर्णी, भूलतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heart surgery successful in pune