हृदय प्रत्यारोपण परवानगी लालफितीत

Sasoon Hospital
Sasoon Hospital
पुणे - हृदय प्रत्यारोपणासाठी रुग्ण तयार आहे, अद्ययावत शस्त्रक्रिया कक्ष सज्ज आहे, अत्यावश्‍यक सोयी-सुविधा आहेत, कुशल आणि प्रशिक्षित डॉक्‍टरदेखील आहेत; पण नाही ती हृदय प्रत्यारोपणासाठी आवश्‍यक सरकारची परवानगी! त्यामुळे ससून रुग्णालयातील ही सुविधा लालफितीच्या कारभारात अडकल्याची माहिती पुढे आली आहे.

ससून रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. राज्यातील सरकारी रुग्णालयातील पहिली यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही येथील वैद्यकीय तज्ज्ञांनी केली आहे. खासगी रुग्णालयात 20 ते 25 लाख रुपयांमध्ये होणारी ही शस्त्रक्रिया कमी खर्चात ससून रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. त्यापाठोपाठ आता हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियेसाठी ससून रुग्णालय प्रशासन पाऊल उचलत आहे. मात्र, हा प्रस्ताव सरकारच्या लालफितीच्या कारभारात अडकला आहे.

ससून रुग्णालयाने हृदय प्रत्यारोपणासाठी आवश्‍यक सोयीसुविधा पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर या शस्त्रक्रियेच्या परवान्यासाठी रुग्णालयाने सरकारकडे प्रस्ताव सादर केला. त्यानुसार, जूनमध्ये रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. त्यात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, हा प्रस्ताव जिल्हा रुग्णालयाकडून दोन महिन्यांनंतरही मान्यतेसाठी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या पुणे परिमंडळाकडे पाठविण्यात आला नव्हता, अशी माहिती पुढे आली. त्यामुळे योग्य दाता मिळाल्यास कोणत्याही क्षणी होणारी ही शस्त्रक्रिया करण्यात मोठा अडथळा निर्माण झाल्याची माहिती ससून रुग्णालयातून मिळाली.

खासगी रुग्णालयात न परवडणाऱ्या आव्हानात्मक शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात करण्यात येत आहेत. हृदय प्रत्यारोपण ही देखील त्यापैकी एक. मात्र, त्याची परवानगी मिळाली नसल्याने ही शस्त्रक्रिया करता येत नाही.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय.

ससून रुग्णालयाला हृदय प्रत्यारोपणाचे प्रमाणपत्र मिळण्याचा रुग्णालय तपासणी अहवाल शिफारशीसह उपसंचालक कार्यालयामार्फत संचालकांना पाठविण्यात आला आहे.
- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे जिल्हा रुग्णालय

हृदयाची कार्यक्षमता कमी झाली आहे. आठ महिने औषध घेऊनही त्याची कार्यक्षमता वाढली नसल्याने हृदय प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. त्यामुळे ससून रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी नावनोंदणी केली आहे.
सोनाली पाटील, रुग्ण, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com