
Heat in Pune : पुण्यात वाढला उन्हाचा चटका!
पुणे : शहरात उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाचा पारा पस्तिशी पर्यंत पोचला आहे. तर किमान तापमान १० अंशांच्या जवळ असल्याने कमाल आणि किमान तापमानातील तफावत कायम आहे. सोमवारी लवळे येथे उच्चांकी ३५.४ अंश तर शिवाजीनगर येथे नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी (ता.१४) कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.
पहाटेच्यावेळी थंडी तर दुपारनंतर उन्हाच्या कडाक्याचा अनुभव पुणेकर सध्या घेत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहराला उन्हाळ्याची चाहूल लागली असून, कमाल तापमानात वाढ होत आहे. असे असले तरी किमान तापमान मात्र अजूनही १० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.
राज्यातही उत्तर महाराष्ट्रात, विदर्भासह मराठवाड्याच्या तापमानात घट झाली आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र किमान तापमानात मोठी घट पाहायला मिळाली. निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढता असून, अनेक ठिकाणी तापमान पस्तिशी पार असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत.
शहरातील सरासरी तापमान (अंश सेल्सिअस)
शिवाजीनगर : १०.६ (किमान) : ३२.३ (कमाल)
पाषाण : १२.८ (किमान) : ३१.८ (कमाल)
चिंचवड : १८.५ (किमान) : ३४.१ (कमाल)
लवळे : १९.४ (किमान) : ३५.४ (कमाल)
मगरपट्टा : १८.४ (किमान) : ३३.१ (कमाल)