यंदा मार्चमध्ये उष्णतेचा कहर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

हवामान अंदाज 
- पुण्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्‍यता 25 ते 50 टक्के 
- चार दिवसांत शहरात कमाल तापमान पुन्हा चाळिशी ओलांडण्याची शक्‍यता 
- मराठवाड्यात येत्या मंगळवारी (ता. 2) काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा 
- मध्य महाराष्ट्रातील उन्हाचा चटका वाढणार

पुणे - तुम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये रस्त्यावरून जाताना उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवला नं! भर बाराच्या उन्हात शाळेत येताना किंवा शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तर नक्कीच उन्हाचा चटका बसलाय. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांचीही उन्हामुळे लाही-लाही झाली. याचं कारण, गेल्या 9 वर्षांमधील सर्वांत "हॉट' अशी यंदाच्या मार्चची नोंद हवामान खात्यात झाली आहे. 

आपल्या पुण्यात मार्चमध्ये कमाल तापमान सर्वसाधारणतः 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं जातं. एप्रिल आणि मेमध्ये ते टप्प्या-टप्प्यानं वाढतं आणि कमाल तापमानाची चाळिशी ओलांडली जाते. यंदा मात्र, मार्चच्या सुरवातीलाच तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. पुण्यात मार्चमध्ये कमाल तापमानाने चाळिशी ओलांडल्याची 2010 पासून ही दुसरी वेळ असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. शहरात 2017 ला मार्चमध्ये दोन दिवस तर, यंदा तीन दिवस कमाल तापमानाचा पारा चाळिशीपेक्षा जास्त नोंदला गेला. 

असे वाढले मार्चमधील कमाल तापमान 
पुण्यातील गेल्या दहा वर्षांतील मार्चमधील कमाल तापमानाची 30 ते 35.9 अंश सेल्सिअस, 36 ते 39.9 आणि 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदले गेलेले तापमान, अशा तीन गटांत वर्गवारी करण्यात आली. पुण्यात 2017 पासून 36 ते 39.9 अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या दिवसांमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. 2010च्या मार्चमध्ये 22 दिवस 30 ते 35.9 अंश सेल्सिअसदरम्यान तापमान होते. याउलट 2019 मध्ये 20 दिवस तापमान 36 ते 39.9 अंश सेल्सिअस इतके होते. यावरून यंदाच्या मार्चमध्ये पुणे "हॉट' झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. 

पुण्यात मार्चमध्ये सर्वाधिक दिवस 30 ते 35.9 अंश सेल्सिअस तापमान 
दहा वर्षांच्या मार्चचे एकूण दिवस 310 होतात. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 172 दिवस पुण्याचं कमाल तापमान 30 ते 35.9 अंश सेल्सिअस नोंदले गेलंय, तर 36 ते 39.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदलेले 133 दिवस आहेत. उर्वरित पाच दिवस कमाल तापमानाच्या पाऱ्यानं चाळिशी ओलांडली. 

हवामान अंदाज 
- पुण्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्‍यता 25 ते 50 टक्के 
- चार दिवसांत शहरात कमाल तापमान पुन्हा चाळिशी ओलांडण्याची शक्‍यता 
- मराठवाड्यात येत्या मंगळवारी (ता. 2) काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा 
- मध्य महाराष्ट्रातील उन्हाचा चटका वाढणार

Web Title: Heat wave in pune