खेडमध्ये पाऊस भरपूर, पण किती?

राजेंद्र सांडभोर
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

खेड तालुक्‍यात यावर्षी सरासरीच्या 200 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या काही वर्षांतील हा उच्चांकी पाऊस असू शकतो. पण, प्रशासनाकडे मागील नोंदी उपलब्ध नसल्याने याबाबत निश्‍चित सांगता येत नाही. पर्जन्यमापनाबद्दल सरकारी स्तरावर गांभीर्य नसल्याचे दिसून येते.

राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्‍यात यावर्षी सरासरीच्या 200 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या काही वर्षांतील हा उच्चांकी पाऊस असू शकतो. पण, प्रशासनाकडे मागील नोंदी उपलब्ध नसल्याने याबाबत निश्‍चित सांगता येत नाही. पर्जन्यमापनाबद्दल सरकारी स्तरावर गांभीर्य नसल्याचे दिसून येते.

ऑक्‍टोबरअखेर खेड तालुक्‍यात 1294 मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे यांनी दिली. तालुक्‍याची सरासरी सध्या 645 धरली जात असल्याने हा पाऊस 200 टक्के होतो. खेड तहसीलदार कार्यालयात यावर्षीच्या पावसाच्या नोंदी व्यवस्थित झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना पाऊस सांगता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या नोंदीनुसार खेड तालुक्‍यात 1433 मिलिमीटर पाऊस झालेला असून तो सरासरीच्या 233 टक्के आहे. या कार्यालयाकडेही फक्त 2012 नंतरचे रेकॉर्ड आहे. यावर्षी जरी सरासरीच्या 200 टक्के पाऊस झाला असला तरी अलीकडच्या काही वर्षांमध्ये खेड तालुक्‍याची पावसाची सरासरी कमी होत चालली आहे.

साधारण 20 वर्षांपूर्वी तालुक्‍याची पावसाची सरासरी 850 मिलिमीटर होती. त्यानंतर ती 750 मिलिमीटर आली. पाच वर्षांपूर्वी 700 मिलिमीटर सांगितली जायची आणि आता तर 645 मिलिमीटर असल्याचे सांगितले जाते. वीस वर्षांत 200 मिलिमीटर पावसाची सरासरी कमी होणे ही गंभीर बाब आहे. पण याबाबत सरकारी स्तरावर फारसे गांभीर्य दिसत नाही. साधे पावसाचे रेकॉर्डही योग्य पद्धतीने ठेवले जात नाही. अधिकारी बदलत जातात. त्या-त्या अधिकाऱ्याला वाटेल तशा नोंदी तो ठेवतो. मागची रेकॉर्ड मागितली तर कार्यालयात उपलब्ध नसतात. अनेक ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बंद पडतात. त्यांकडे कुणी पाहत नाही. मधेच ती सुरू करतात. मध्येच बंद असतात. पाऊस योग्य पद्धतीने मोजला जातो की नाही याची तपासणी करणारी यंत्रणा नाही. अनेक ठिकाणी अकुशल कर्मचारी पाऊस घेतात. तो तंतोतंत असेलच असे सांगता येत नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain In Khed Tehesil