पुणे : आंदर मावळात जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

आंदर मावळात जोरदार पाऊस पडत असल्याने आंद्रा आणि ठोकळवाडी धरणाच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे.

टाकवे बुद्रुक : आंदर मावळात जोरदार पाऊस पडत असल्याने आंद्रा आणि ठोकळवाडी धरणाच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे. ओढे नाले दुथडी भरून वाहत असून, बोरवली कांब्रे जवळ खांडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी आले आहे. गुडघा भर पाण्यातून वाहनचालक वाहने घेऊन जात आहे.

आंदर मावळाला शहराशी जोडणाऱ्या कान्हे फाटा ते खांडी रस्त्याचे रुंदीकरण करावे तसेच टाटा धरणाचे पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या ठिकाणाच्या रस्त्याची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील वीस वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडत आहे, पंचावन्न वर्षापूर्वी टाटाचे ठोकळवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत होते, मध्ये २००५ च्या सुमारास वडेश्वर जवळचा रस्ता पाणी खाली गेला होता. पण त्यानंतर टाटाने या रस्त्याची उंची वाढविल्याने हा रस्ता वाहतुकीला आता खुला आहे. 

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात बोरवली कांब्रे जवळचा रस्ता पाण्यात गेल्याने वाहनचालक जीवमुठीत धरून प्रवास करीत आहे. विशेषत रात्रीच्या प्रवासात हा धोका अधिक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात या रस्त्याचे सर्वेक्षण करून आवश्यक तेथे योग्य उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in the maval