पिंपरीसह परिसरात धुवाधार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

- विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी
- नागरिकांची उडाली त्रेधातिरपीट

पिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहर व परिसराला मंगळवारी (ता. 24) मध्यरात्री व दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

 
सोमवारी दिवसभर ऊन पडल्याने उकाडा जाणवत होता. दुपारी काही काळ ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाची शक्‍यता वाटत नव्हती. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. सुमारे दोन तास हा पाऊस सुरू होता. दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. अर्धाच तास झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील मुख्य रस्त्यांसह निगडी ते दापोडी ग्रेडसेपरेटर आणि सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

 
थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालयाच्या तळमजल्यात पाणी शिरले. येथेच पाणीपुरवठा कर, मिळकत कर भरण्याचे केंद्र असून. शेजारीच आधार कार्ड नोंदणी केंद्र आहे. दरम्यान, येथे गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. यात कार्यालयातील काही कागदपत्रेही भिजली. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच चिंचवड विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असून, येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांचीही वर्दळ वाढली आहे. दरम्यान, येथे पाणी शिरल्याने अनेकांची गैरसोय झाली. गांधीनगरमधील वडार गल्लीतील घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे रहिवाशांची धांदल उडाली.

 
अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे रस्तेही कोरडे पडल्याने रस्त्यावरील धुळीमुळे रस्त्यालगत माती साचली होती. दरम्यान, पावसामुळे या मातीचा झालेला चिखल रस्त्यावर पसरल्याने काही ठिकाणी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या. 

वाहतुकीचा वेग मंदावला 
मंगळवारी सकाळी ऊन पडल्याने अनेक जण छत्री, रेनकोट सोबत न घेताच घराबाहेर पडले. मात्र, दुपारी अचानक झालेल्या पावसाने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी वाहनचालक रस्त्यावरील झाडाखाली अथवा पुलाखाली थांबल्याने अनेक मार्गांवरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. 

रस्त्यांवर तळे 
निगडीतील टिळक चौकात तसेच आकुर्डीतील बजाज कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. वल्लभनगर येथील भुयारी मार्गाला तळ्याचे स्वरूप आल्याने यातून मार्ग काढताना चालकांना कसरत करावी लागत होती. 

हिंजवडीत वाहतूक ठप्प 
मुळशी तालुक्‍याच्या पूर्व पट्ट्यात मंगळवारी (ता. 24) दुपारी अडीचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने हिंजवडीसह माण, मारुंजी, नेरे, जांबे व कासारसाई हा परिसर झोडपून काढला. तब्बल तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे आयटीपार्कमधील सर्वच रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. रस्त्यावरील पाण्यातून मार्ग काढताना आयटीयन्सना मोठी कसरत करावी लागली. सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. 

 

देहू परिसरात मुसळधार पाऊस

देहू आणि देहूरोड परिसरात मंगळवारी पहाटेपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. रेल्वेस्थानकाजवळील बसस्थानकालगतच्या झाडावर वीज पडून झाड कोसळले; तर अनेक घरात पावसाचे पाणी शिरले. काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. 

मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसास सुरवात झाली. सुमारे चार तास पडलेल्या पावसाने ओढेनाले पाण्याने भरून वाहू लागले. देहूतील अनगडशावली दर्ग्याजवळील ओढ्याला पूर आला; तर झेंडेमळा येथील घराघरांत पाणी शिरले, अशी माहिती प्रदीप झेंडे या स्थानिकाने दिली. मंगळवारी दुपारीही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे देहूरोड बाजारपेठेतील ग्राहकांची तारांबळ उडाली. देहूतील प्रवेशद्वाराजवळ पावसाचे पाणी साचले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in pimpri chinchwad city.