मुसळधार पावसाने पुन्हा झोडपले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

आजही पावसाचा इशारा 
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बुधवारी (ता. २३) ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागातर्फे मंगळवारी (ता. २२) वर्तविण्यात आला. पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे- पुण्याला सोमवारी रात्री मुसळधार पावसाने पुन्हा झोडपले. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती आणि उपनगरांमधील काही घरांमध्ये पाणी शिरले. 

सप्टेंबरअखेर पुण्यात पावसाने जोर धरला होता. मेघगर्जनेसह २५ सप्टेंबरला कोसळलेल्या पावसाने २२ नागरिकांना प्राण गमवावे लागले; तर चौघे अद्यापही बेपत्ता आहेत. याच घटनेची आठवण करून देणारा प्रसंग सोमवारी मध्यरात्रीनंतर सातारा रस्ता, सिंहगड रस्ता परिसरात निर्माण झाला होता. त्या घटनेच्या आठवणीने नागरिक धास्तावले होते. पुण्यात तीन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मतदानादिवशी पावसाने विश्रांती घेतली. पण, रात्री पुन्हा पाऊस सक्रिय झाला. रात्री बारापासून जोरदार सरी कोसळू लागल्या. त्यामुळे काही वेळेत रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वेगाने वाहू लागले. रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप आले. पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत होती. 

आजही पावसाचा इशारा 
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बुधवारी (ता. २३) ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागातर्फे मंगळवारी (ता. २२) वर्तविण्यात आला. पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरत असल्याने सध्या राज्यात वादळी पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in pune