धो धो पावसाने पुणेकरांची उडाली दैना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

येथे बसला पावसाचा दणका...

  • सोमनाथनगर (वडगाव शेरी) येथील सारेधाम सोसायटीत पाणी शिरले
  • बिबवेवाडी, सहकारनगर, खडकी परिसरातील रहिवासी धास्तावले
  • औंध रस्ता, चिखलवाडी, खडकी स्टेशन परिसरात विजेचा लपंडाव
  • महर्षीनगरमधील डायस प्लॉट मार्केट यार्डमध्येही पाणी 
  • बी. टी. कवडे रस्ता, कोंढवा, येरवडा, कोरेगाव पार्क, फातिमानगर, वानवडी परिसरातील घरांत पाणी शिरले.

पुणे - एका दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर रविवारी (ता. ३) सायंकाळी पुन्हा एकदा पावसाने मेघगर्जनेसह शहरात धुमाकूळ घातला. धो धो पडणाऱ्या पावसामुळे ओढ्यानाल्यांना पूर आल्याने बिबवेवाडी, येरवडा, वडगाव शेरी, कोरेगाव पार्क परिसरातील सोसायट्या, वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये घबराट उडाली होती. अनेक रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे शहरात ठिकठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने पुणेकरांची दैना उडाली. 

रविवारी दिवसभर कडक ऊन पडले होते. दुपारनंतर पुणेकर घराबाहेर पडले. मात्र, सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने त्यांची तारांबळ उडाली. शहरावर १२ किलोमीटर जाडीचा ढग निर्माण झाल्याने मुसळधार पावसाचे संकेत सायंकाळी हवामान विभागाच्या रडारवरून मिळाले होते. त्याप्रमाणे सायंकाळी सहानंतर वडगाव शेरी, विमाननगर, मुंढवा, केशवनगर, खराडी, हडपसर, रामवाडी, कात्रज, लष्कर, पुलगेट यासह मध्यवर्ती पेठा, धायरी, सिंहगड रस्ता, कोथरूड, औंध यासह सर्वच भागात पावसाला सुरवात झाली. त्यातच वीजपुरवठा गायब झाल्याने अंधारात वाढत जाणाऱ्या पावसामुळे आंबील ओढा परिसरातील पूरग्रस्तांची धास्ती वाढली. गुरुराज सोसायटीच्या दोन इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी घुसल्याने तेथील रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.

वडगाव शेरीतील सोमनाथनगर, मुंढवा, वानवडी, फातिमानगर, महर्षीनगर या भागातील वस्त्यांमध्ये व सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. जोरदार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याचे दिसत होते. यामुळे नगर रस्ता, सोलापूर रस्ता या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली. अवघे एक ते दोन किलोमीटरचे अंतर पार करण्यास नागरिकांना एक तास लागला. सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाल्यानंतर साडेआठच्या सुमारास पाऊस हळूहळू कमी झाला. पाऊस थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in pune