पुण्याला पावसाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी सायंकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. कात्रज, कोंढवा, सहकारनगर आणि बिबवेवाडीसह उपनगरातील काही भागांत गारांसह पाऊस झाला. अवघ्या अर्ध्या तासात अनेक रस्ते जलमय झाले, तर काही रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले होते.

पुणे - शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी सायंकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. कात्रज, कोंढवा, सहकारनगर आणि बिबवेवाडीसह उपनगरातील काही भागांत गारांसह पाऊस झाला. अवघ्या अर्ध्या तासात अनेक रस्ते जलमय झाले, तर काही रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले होते.

शहरात रविवारी मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. शाळा-महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांना सुटी होती. त्यामुळे त्याचा फटका फारसा बसला नाही. हवामानशास्त्र विभागाने सोमवारी शहरात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला होता. सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच आकाशात काळे ढग जमण्यास सुरवात झाली. त्यामुळे पावसाचा अंदाज घेत अनेकांनी घाईघाईने घर गाठले. परंतु, मुसळधार पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील रविवार पेठेसह लक्ष्मी रस्त्यावर बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली. विशेषत: महिलांना त्याचा फटका बसला.

कार्यालयातून घरी परतणाऱ्या नोकरदारांनाही पावसामुळे बराच वेळ अर्ध्या रस्त्यात अडकून पडावे लागले. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास काही वेळ पाऊस थांबला. परंतु, काही ठिकाणी हलक्‍या सरी कोसळत होत्या. त्यानंतर रात्री काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला.

उपनगरांमधील कात्रज, सातारा रस्ता, कोंढवा, सहकारनगर, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, वडगाव शेरी, नगर रस्ता, मुंढवा, केशवनगर, उंड्री, पिसोळी, वाकडेवाडी, मुळा रस्ता, वारजे माळवाडी, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे धावडे, नांदेड, किरकटवाडी परिसरातही जोरदार पाऊस झाला. रस्त्यांवरील खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in pune